पिंपरी-चिंचवडमध्ये दीडशे शाळांनी केली आरटीईत नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांनी ऑनलाइन नोंदणी करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे शिक्षण विभागाने तीन वेळा मुदतवाढ देण्याची शक्कल लढविली. परिणामी, १४७ खासगी शाळांनी नोंदणी केली. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ शाळांनी नोंदणीकडे पाठ फिरविली. शाळांच्या प्रतिसादावरून प्रक्रिया लांबण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी - आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांनी ऑनलाइन नोंदणी करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे शिक्षण विभागाने तीन वेळा मुदतवाढ देण्याची शक्कल लढविली. परिणामी, १४७ खासगी शाळांनी नोंदणी केली. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ शाळांनी नोंदणीकडे पाठ फिरविली. शाळांच्या प्रतिसादावरून प्रक्रिया लांबण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी २१ जानेवारीपासून शाळा नोंदणीस सुरुवात झाली. त्यास सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु सुरुवातीच्या पंधरा दिवसांत फक्त ८८ शाळांनीच नोंदणी केली होती. याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. नोंदणीला असलेला प्रतिसाद पाहता, खासगी शाळा दुर्लक्ष करत आहेत; तर काही शाळांनी राज्य सरकारकडून शुल्क प्रतिपूर्ती मिळत नसल्याने या प्रक्रियेत सहभाग घेण्याचा पवित्रा घेतला होता. नोंदणी कमी झाल्याने शिक्षण विभागाने तीन वेळा मुदतवाढ दिली. त्या वाढलेल्या चार दिवसांच्या मुदतीत शाळांची नोंदणी वाढली. तरीही मंगळवारी (ता. ११) सायंकाळी उशिरापर्यंत १४७ शाळांनी नोंदणी केली.

नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बुधवारपासून (ता. १२) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ही प्रक्रिया २९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर ११ व १२ मार्चदरम्यान प्रवेशासाठीची संभाव्य सोडत काढण्यात येईल. गेल्या वर्षी १७६ शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. या वर्षी मात्र दोन वेळा मुदतवाढ देऊन केवळ १४७ शाळांनीच नोंदणी केली आहे. आकुर्डी आणि पिंपरी या विभागाअंतर्गत शाळांची नोंदणी केली जाते; परंतु यंदा शाळांनी नोंदणी करण्यास नकारघंटा दर्शवल्याने आकुर्डी विभागाअंतर्गत १०२; तर पिंपरीअंतर्गत ४५ शाळांनीच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 school rte registration in pimpri chinchwad