अठरा कोटी ग्यालन पाणी...!

अठरा कोटी ग्यालन पाणी...!
Published on

हौसऑफबांबू ०७०८२६अठराकोटीसाहित्य

अठरा कोटी ग्यालन पाणी...!

नअस्कार! गेले काही दिवस निपचित पडून होत्ये. कांदा, चप्पल हुंगून हुंगून शुद्धीवर येता येता पुन्हा बेशुद्ध पडत होत्ये. डॉक्टर म्हणाले, ‘‘कसला तरी मानसिक धक्का बसलाय! काही पाहिलं-ऐकलं-वाचलं का?’’ मला बाई काईच आठवेना!
आत्ता आठवलं!! गेल्या आठवड्यात मराठी भाषामंत्री उद्योगजी सामंत यांनी पुण्यात येऊन १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जवळपास अठरा कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. अठरा कोटी! हा आकडा ऐकूनच मला अंधारल्यासारखं झालं. एरवी आम्ही संमेलनाला दोन कोटी देतो, यावेळी शंभरावं संमेलन असल्यामुळे तीन कोटी वाढवून देतोय. शिवाय नव्याण्णव नांदी संमेलनं भरवणार असल्याने त्याचे पाच कोटी वेगळे देतोय. ‘जेन झी’वाल्यांनी झीट आणली असल्याने यावेळी विद्यार्थी संमेलनांसाठी आणखी चारेक कोटी देतोय. शिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेला गंमत म्हणून एक कोटी आत्ताच्या आत्ता देतोय...असं सांगून उद्योगजी सामंतांनी थेट चेकच ‘मसाप’चे अध्यक्ष सोमणमहाराजांच्या हातात ठेवला. त्यांनी तो चेक शेजारी विकेटकीपिंगच्या पोझिशनमध्ये उभ्या असलेल्या कोषाध्यक्ष प्रदीपजी निफाडकर ऊर्फ ‘गजलप्रदीप’ यांच्या हाती दिला. ‘मसाप’च्या कचेरीत यापुढे चिमुकल्या कोपातल्या चहासोबत सामोसे आलेच पाहिजेत, ही मागणी तातडीने मंजूर झाली. (काय ती सँडविचेऽऽ...अहाहा!!) एवढा बट्ट्याबोळ करून उद्योगजी सामंत तातडीने मुंबईला रवाना झाले.
पाच कोटीचं मुख्य साहित्य संमेलन गाठण्यापूर्वी नव्याण्णव नांदी संमेलनं पार करावी लागणार आहेत. ‘मसाप’च्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे विद्यापीठात नुकतीच सभा भरली होती. त्यात ‘‘नांदी संमेलनं घ्या, पण आम्ही ‘उचलून’ काहीही देणार नाही, तुमचं तुम्ही बघा! अगदीच अडलात, तर आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, याची खात्री बाळगा!’’ असं या सभेत बजावण्यात आल्याचं कळतं. आता आम्ही ‘उचलून’ काही देणार नाही, असं म्हणता, मग पाच कोटी कुठे खर्च करणार आहात? असं काही कुणी विचारलं नाही, हा भाग वेगळा!
‘जेन झी’वाल्यांच्या भाषेचा नवनवोन्मेष नुकताच अवघ्या देशाने कर्णरंध्रे तृप्त होईपर्यंत पाहिला आहे. उगीच विस्तवाशी का खेळा? असा विचार करून औंदा अकरा विद्यार्थी संमेलनंही घेतली जाणार आहेत. त्याआधी १६ ऑगस्टपासून अण्णाभाऊ साठे विचारवेध संमेलनही पुण्यातच होतंय, आणि त्याच्या अध्यक्षपदी प्रज्ञा पवार आहेत!! एकंदर येणारा काळ हा एकदम झणझणीत, खणखणीत असणार याचीच ही नांदी...हे खरं नांदी संमेलन मानायला हवं!
अठरा कोटी रुपये एकरकमी बघण्याची मराठी साहित्यिकांची ही इतिहासातली पहिलीच वेळ असावी. मराठी भाषेच्या उत्सवावर कुणी येवढे पैसे खर्च करील यावर एरवी विश्वास बसला नसतात. ‘मसाप’ला तर हातखर्चाला एक कोटी मिळाले आहेत. हे मागितले होते, मावळून घरी गेलेल्या कार्यकारिणीने. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्हाला किती हवेत?’ एवढा एकच प्रश्न विचारला. एक कोटी मंजूर केले, सातारा संमेलनात तसं पत्र त्यांनी दिलं, आणि आता थेट पैसे! आमचे नवे कोषाध्यक्ष बेष्ट पायगुणाचे आहेत, येवढाच त्याचा अर्थ. आता या एक कोटीचं काय करायचं? हासुद्धा एक प्रश्न आहेच.
औंदा साहित्य संमेलनात पाच कोटी आल्यामुळे नॉनव्हेज सेक्शन वेगळा करण्यात येणार असून तंदूर आयटेमची रेलचेल असेल, अशी आवई काही नवसाहित्यिकांनी उठवली आहे. खरं खोटं ‘मसाप’ जाणे!!
अनिल बर्व्यांची ‘अकरा कोटी गॅलन पाणी’ ही लेखमाला फेमस आहे. ती मला उगीचच आठवली. साहित्य संमेलनाचे अठरा कोटी सत्कारणी लागोत, नाहीतर तेही पाण्यात जायचे, एवढंच माझं म्हणणं...लगाव बत्ती!
-कु. सरोज चंदनवाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com