पुणे जिल्ह्यातील वीस धरणे फूल; माणिकडोह २० टक्के रिकामेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dam

पुणे जिल्ह्यातील टाटांची पाच धरणे वगळता उर्वरित २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत.

पुणे जिल्ह्यातील वीस धरणे फूल; माणिकडोह २० टक्के रिकामेच

पुणे - पुणे जिल्ह्यातील टाटांची पाच धरणे वगळता उर्वरित २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण अद्याप २० टक्के रिकामेच राहिले आहे.

दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून आजघडीला (शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत) २००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण १०१ टक्के इतके आहे. जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १७६.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षीच्या या पाणीसाठ्याचे प्रमाण हे ८८.८७ इतके होते. गेल्या वर्षीच्या आजखेरपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्यात यंदा २४.३१ टीएमसीने वाढ झाली आहे. यंदा एकूण पाणीसाठयाच्मा प्रमाणात १२.१३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे. प्रत्यक्षात या धरणा़मध्ये आजअखेर २००.५९ टीएमसी पाणी साठले आहे. उजनी धरणाच्या भिंतीची उंची फ्लॅगच्या माध्यमातून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या क्षमतेत ६.६८० टीएमसीने वाढ झाली असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जिल्ह्यातील फूल झालेली धरणे

टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, आंद्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी,भाटघर, वीर, नीरा देवघर, वडज, डिंभे, विसापूर आणि उजनी (१०८.६६ टक्के).

(टीप :- फ्लॅगमुळे उजनी धरण एकूण क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे.)

नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली धरणे

भामा आसखेड, पिंपळगाव जोगे, येडगाव, चिल्हेवाडी आणि घोड.

फ्लॅगमुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ

उजनी धरणाच्या भिंतीवर फ्लॅग लावण्यात आले आहेत. या फ्लॅगमुळे उजनीच्या पुर्वीच्या एकूण पाणीसाठा क्षमतेत ६.६८० टिएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीच्या एकूण पाणीसाठ्याचे प्रमाण हे आता १०० टक्क्यांऐवजी ११०.५९ टक्के इतके ग्राह्य धरले जात आहे. उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता ११७.२४ टिएमसी इतकी आहे.

धरणाच्या भिंतीवर फ्लॅग लावणे म्हणजे काय?

कोणत्याही धरणाची पुर्वीपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी फ्लॅग लावले जातात. हे फ्लॅग म्हणजे प्रत्यक्षात भिंतीची कायमस्वरूपी उंची न वाढवता, या फ्लॅगच्या माध्यमातून भिंतीची उंची तात्पुरती वाढवली जाते. थोडक्यात भिंतीची तात्पुरती उंची वाढविण्यासाठी दिलेला जोड म्हणजे फ्लॅग होय. यालाच धरणांबाबत वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक भाषेत फ्लॅग लावणे, असे म्हणतात.

खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेक्सने विसर्ग

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये शुक्रवारी (ता. १६) दुपारी बारा वाजल्यापासून २२,८८० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचे खडकवासला प्रकल्पाचे सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी सांगितले.

याशिवाय मुळशी धरणातून २६ हजार ४०० क्युसेकने, चासकमानमधून १२ हजार ६५० क्युसेकने, पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आठ हजार ६०० क्युसेकने आणि कासारसाई धरणातून एक हजार ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

Web Title: 20 Dams Full In Pune District Rain Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainwaterdam