धरण उशाला; कोरड घशाला ! 

मंगेश कोळपकर
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात. 

पुणे : नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात. 

रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा परिषदेच्या टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात आहे. एकिकडे जिल्ह्यात पाऊस असताना इंदापूर परिसरात मात्र, दुष्काळाची झळ आहे. रेडणी गावात सोनाई दूध संस्थेतर्फे चारा छावणी सुरू आहे. त्यात 1200 जनावरे आहेत तर, तालुक्‍यात 9 चारा छावण्या सुरू असून त्यात सुमारे 15 हजार जनावरे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

एकीकडे पशुधनाचा प्रश्‍न असताना दुसरीकडे शेतीचाही प्रश्‍न तेवढाच गंभीर झाला आहे. या गावांत पेरण्या झाल्या होत्या. पण पावसाअभावी त्या जळून गेल्या. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातून दुष्काळाचे वास्तव समोर येते. वीर धरणातून पाण्याचे आवर्तन नियमितपणे सोडले तर, या 22 गावांचा शेतीचा प्रश्‍न सुटू शकतो. त्यासाठी लागले तर जलसंपदा विभागाकडे पैसे भरण्याचीही त्यांची तयारी आहे. मात्र, स्थानिक राजकारणामुळे पाणी सोडले जात नाही, असा परिसरातील रहिवाशांचा आरोप आहे. गेल्या 40- 50 वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित असून यंदाच्या निवडणुकीत या प्रश्‍नाची तड लावण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. 

इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येते. लगतच्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार अनेक वर्षे आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पवार तसेच या मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन पाटील राज्यस्तरीय नेते आहेत. दत्तात्रेय भरणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सुळे, पवार, पाटील हे राज्यस्तरीय नेते असले तरी या 22 गावांचा पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. एवढ्या वर्षात या भागासाठी एखादी पाण्याची योजना मार्गी लागणे शक्‍य होते. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत या प्रश्‍नाची तड लावण्याचा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 villages in Indapur are struggling for water on daily basis