पुणेकऱ्यांच्या खिशावर 23 कोटींचा डल्ला (व्हिडिओ)

पुणेकऱ्यांच्या खिशावर 23 कोटींचा डल्ला (व्हिडिओ)

पुणे - पाषाण तलाव, कात्रजमधील नानासाहेब पेशवे तलाव आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या वाहन खात्याने तब्बल २३ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. स्थायी समितीने या निविदांना मंजुरी दिल्यानंतर या कामाला सुरवात होणार आहे. महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांची तत्परता आणि पर्यावरणाबाबत असलेली संवेदनशीलता पाहून ‘सकाळ’ने या तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा संबंधित तलावांत जलपर्णी नसल्याचे उघड झाले आहे. 

गेल्या तीन महिन्यांत चकाचक झालेल्या या तिन्ही तलावांतील नसलेली जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदारांच्या खिशात २३ कोटी रुपये कोंबण्याचा ‘जलमार्ग’ महापालिकेतील निवडक पदाधिकारी आणि वाहन खात्यातील काही अधिकाऱ्यांनी शोधला आहे. त्यात केवळ पाषाण तलावातील जलपर्णीवर पावणे अकरा कोटी खर्च होणार आहेत. 

विशेष म्हणजे एका ठेकेदाराला निविदा मंजूर होण्याची खात्री होती. त्यामुळे त्याने निविदा मंजूर होण्याआधी महिनाभरापूर्वीच पाषाण तलावात आपली यंत्रणाही उभी केली आणि कामाचे प्रात्यक्षिक दाखविले. निविदा भरल्यापासून ही सगळी यंत्रणा तलावातच आहे. तलावात जलपर्णी नाही. जरी ती असली तरी ती काढायची झाल्यास ते काम तासाभराचेच आहे, हे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनीच संपूर्ण तलाव फिरवून ‘सकाळ’च्या प्रतिनिधींना दाखवून दिले. त्याचे चित्रीकरणही ‘सकाळ’कडे उपलब्ध आहे. 

कामे दोन टप्प्यांत 
महापालिकेने काढलेल्या निविदेत प्रत्येक तलावांसाठी दोन टप्प्यांत कामे करायची आहेत. पहिला टप्पा तीन आणि दुसरा टप्पा ३३ महिन्यांचा आहे. या टप्प्यात प्रत्येक तलावामागे सव्वा ते अडीच कोटी रुपये खर्च दाखवला आहे. म्हणजे निविदेच्या पहिल्या टप्प्यांतच दहा कोटींची कामे दाखविण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यांत तलावात जलपर्णी येणार नाही, याची काळजी ठेकेदाराने घ्यावयाची आहे.  

तीन महिन्यांपूर्वीच पाषाण तलावातील जलपर्णी काढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. आता यंत्राद्वारे ती काढण्याचा निर्णय वाहन खात्याने घेतला आणि निविदा मागविल्या. येथील जलपर्णीसाठी गेल्या चार वर्षांत पाच कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.

पेशवे तलाव आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावातील जलपर्णीवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा झाली. परिणामी, स्थानिक नगरसेवकांनी या दोन्ही तलावांतील जलपर्णी काढल्याचे नागरिकांनी सांगितले. तरीही या तलावांसाठी पहिल्या तीन महिन्यांत अडीच कोटी रुपये खर्च निविदेत दाखवला आहे.

जलवाहिन्यांऐवजी
तलावांत सांडपाणी सोडले जात असल्याने जलपर्णीला पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी ‘सकाळ’ला सांगितले. या पार्श्‍वभूमीवर तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी स्वतंत्र जलवाहिन्या टाकणे आवशक्‍य आहे; परंतु त्याऐवजी जलपर्णी काढण्याचा उपाय पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी निवडला आहे.

तलावांमधील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. त्याची पडताळणी करून मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येतील. तिच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
किशोर पोळ, प्रमुख, वाहन विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com