तीन सदस्यांची प्रभाग पद्धत रद्द; पुणे महापालिकेचे २० लाख रुपये वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elections voter lists

तीन सदस्यांची प्रभाग पद्धत रद्द; पुणे महापालिकेचे २० लाख रुपये वाया

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली, आवश्‍यक कामांसाठी निविदाही काढल्या. पण आता ही तीन सदस्यांची प्रभाग पद्धतीच रद्द झाल्याने आतापर्यंत मतदारयादीवर झालेला खर्च वाया जाणार आहे. मतदारयाद्यांच्या छपाईसाठी २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे, तर या याद्यांच्या विक्रीतून ५ लाख ७५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तरीदेखील २० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची तीनच्या प्रभागानुसार तयारी सुरू करण्यात आली. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर महापालिकेने मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू केले होते. ३१ मे २०२२ पर्यंत शहरात ३४ लाख ५४ हजार इतकी मतदारसंख्या निश्चित करण्यात आली, या मतदारांची प्रभागनिहाय फोड करून प्रारूप मतदारयादी जाहीर केली.

प्रभागरचना अंतिम झाली तरी आपल्या हक्काचे मतदार आपल्या प्रभागात आहेत, की दुसऱ्या प्रभागात गेले याची चिंता इच्छुक उमेदवारांना असते. तीनचा प्रभाग करताना सरासरी एका प्रभागाचे मतदार ५५ हजार इतके होते. प्रारूप मतदारयादीचा अभ्यास करण्यासाठी निवडणूक शाखेच्या कार्यालयातून मतदारयाद्या विकत घेण्यात आल्या, त्यासाठी प्रति पान दोन रुपये इतके शुल्क घेण्यात आले. काही जणांनी थेट पेनड्राइव्हद्वारे मतदारयाद्या घेऊन त्यांचा अभ्यास सुरू केला. यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा समावेश होता, नागरिकांचा प्रभाग बदलण्यात आल्याने इच्छुकांच्या पाया खालची वाळू सरकली होती. यावर सुमारे ५ हजार हरकती घेतल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात येऊन अंतिम मतदारयादी जाहीर केली.

महापालिकेने मतदारयादी, विविध प्रकारचे अर्ज, माहिती संकलन करण्याचे तक्ते यांसह इतर कागदपत्रांच्या छपाईसाठी ७५ लाख रुपयांची निविदा काढली. त्यानुसार मतदारयादी व इतर छपाईसाठी सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पण आता तीन सदस्यांचा प्रभाग रद्द झाल्याने ही सर्व प्रक्रिया वाया गेली. त्यामुळे हा खर्चही वाया गेला आहे. प्रारूप यादीच्या विक्रीतून महापालिकेला ४ लाख १८ हजार ८८७ रुपये मिळाले तर, अंतिम मतदार यादीच्या विक्रीतून १ लाख ५६ हजार ९९४ रुपये मिळाले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.

Web Title: 25 Lakhs Spent On Voter List So Income Is Five Lakhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top