स्पाईस जेटने आणले 30 हजार भारतीयांना देशात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 15जुलैनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे.मात्र,जगभरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मिशन वंदे भारत सुरू केले.त्यात स्पाईस जेटने मोलाचा वाटा उचलला आहे.

पुणे - कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरात विविध शहरांत अडकलेल्या सुमारे 30 हजार भारतीयांना आणण्यासाठी स्पाईस जेटने 200 चार्टर विमानांचा वापर केला. "मिशन वंदे भारत', अंतर्गत या प्रवाशांना देशात आणून आपापल्या गावी पोचविण्यात आले आहे. 

कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभरातील विमान वाहतूक सेवा बंद आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र, जगभरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मिशन वंदे भारत सुरू केले. त्यात स्पाईस जेटने मोलाचा वाटा उचलला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

स्पाईस जेटने संयुक्त अरब अमिरातीमधून 111 विमानांच्या फेऱ्यांद्वारे 20 हजार भारतीयांना परत आणले आहे. तसेच ओमान, लेबानान, कतार, श्रीलंका येथून 50 विमानांच्या फेऱ्यांद्वारे 10 हजार भारतीयांना परत आणले आहे. तसेच 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असून त्यातही स्पाईस जेटकडून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. 

या बाबत स्पाईस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजयसिंग म्हणाले, कोरोना आपत्तीच्या काळात विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात स्पाईस जेटने मोलाचा वाटा उचलला, याचा आम्हाला अभिमान आहे. इतकेच नव्हे तर कार्गोमार्फत 20 हजार टन मालाची वाहतूक केली आहे. औषधे, पूरक साहित्य व वैद्यकीय उपकरणे, फळे, भाजीपाला आदींची देशात आणि परदेशातही वाहतूक केली आहे. जगात सुमारे 30 देशांत स्पाईस जेटचे कार्गो नेटवर्क आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पाईस जेटने प्रवासी विमानांतूनही 7 एप्रिलपासून माल वाहतूक केली असून, अशा प्रकारे माल वाहतूक करणारी आमची देशातील पहिलीच विमान कंपनी आहे, असेही अजयसिंग यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30,000 Indians stranded in various cities around the world due to the Corona