बारामतीकरांची दंड आकारूनही सवय काही जाईना; बेशिस्त वाहन चालकांकडून पाच महिन्यांत 35 लाख वसूल 

मिलिंद संगई
Wednesday, 30 September 2020

बेशिस्त वाहने लावण्याबद्दल गेल्या पाच महिन्यांत बारामतीकरांनी तब्बल 35 लाखांचा दंड भरूनही लोक अजूनही अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क करण्याची सवय बदलण्यास तयार नाहीत. 
 

बारामती (पुणे) : बेशिस्त वाहने लावण्याबद्दल गेल्या पाच महिन्यांत बारामतीकरांनी तब्बल 35 लाखांचा दंड भरूनही लोक अजूनही अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क करण्याची सवय बदलण्यास तयार नाहीत. 
बारामती शहराचा गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तार झाला, तशी दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही तितक्‍याच वेगाने वाढली. रस्ते अरुंद व वाहनांची संख्या प्रचंड असे व्यस्त समीकरण बारामतीत गेल्या काही वर्षांपासून दिसते आहे. शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यावर या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची बाब नवीन राहिलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीच्या वाहतुकीच्या समन्वयासाठी असलेल्या वाहतूक शाखेने गेल्या मे महिन्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत 17643 गाड्यांवर कारवाई केली. यात 70 टक्के कारवाई ही चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करणे, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे, अस्ताव्यस्त गाडी लावणे यासाठी केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सर्व कारवाई करताना कोठेही पोलिसांनी एकही रुपया दंड स्वीकारलेला नसून सर्व दंड ऑनलाइन भरणे आता अनिवार्य झालेले आहे. 

संजीव धुरंधर यांचा सन्मान; अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड

अपुऱ्या मनुष्यबळात होतेय काम 
बारामतीच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी फौजदार दर्जाचा एक अधिकारी व पाच पोलिस कर्मचारी इतके अपुरे मनुष्यबळ आहे. बारामतीतील वाहनांची संख्या लाखाच्या घरात असताना इतक्‍या अपुऱ्या मनुष्यबळात वाहतुकीला शिस्त कशी लागणार हा एक प्रश्न आहे. सीसीटीव्ह कॅमेऱ्यांचा रखडलेला प्रस्ताव, सिग्नल असूनही त्याचा उपयोग नाही, यामुळेही वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. 

आकारण्यात आलेला दंड 
- मे- 8 लाख 5 हजार 
- जून- 9 लाख 37 हजार 
- जुलै- 7 लाख 53 हजार 
- ऑगस्ट- 9 लाख 64 हजार 
- सप्टेंबर- 10 लाख 

वाहनांवर झालेली कारवाई 
- मे- 2682 
- जून- 3448 
- जुलै-2778 
- ऑगस्ट- 4035 
- सप्टेंबर- 4700 

या कारणांसाठी झाली कारवाई 
- वाहन चालविण्याचा परवाना नसणे 
- परवाना आहे पण तो जवळ न बाळगणे 
- एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे 
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे 
- नो पार्किंगमध्ये वाहन लावणे किंवा कोंडी निर्माण करणे 
- लहान मुलांनी गाडी चालविणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 lakh recovered from unruly drivers in Baramati in five months