esakal | पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता

बोलून बातमी शोधा

vaccine

पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : गेल्या तीन चार दिवसांपासून शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने रविवारी बहुतांश केंद्र बंद असल्याने फक्त १ हजार ७०६ जणांचेच लसीकरण झाले. मात्र, आज शासनाकडून पुणे महापालिकेला कोविशिल्ड लसीचे ३५ हजार डोस मिळाले असल्याने पुढील दोन दिवस तरी लसीकरण व्यवस्थित होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात पुणे शहराला केवळ ४५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र जास्त व लस कमी अशी स्थिती झाल्याने त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाला. ऑनलाइन नोंदणी करून त्यांना दिलेल्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर गेलेल्या नागरिकांवर ‘लस संपल्याने केंद्र बंद झाले आहे’ असे फलक पाहून परत फिरण्याची नामुष्की आली. खासगी लसीकरण केंद्रांनी परस्पर दुसऱ्याच नागरिकांना लस देऊन टाकल्याचे प्रकारही घडले आहेत. शहरात लसीकरण केंद्रांची संख्या १८२ इतकी झाली असून, यामध्ये ११० शासकीय तर ७२ केंद्र खासगी आहेत. शनिवारी १२५ केंद्र सुरू होते, त्यामध्ये केवळ ५ हजार ३७२ नागरिकांचे लसीकरण झाले.

कोथरूड येथील गांधी भवन येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केंद्राला केवळ ५० लस उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे तेथील लसीकरण दोन तासात बंद झाले. अशाच प्रकारची अवस्था इतर लसीकरण केंद्रातील आहे. रविवारी खासगी केंद्रांवर अतिशय कमी लस उपलब्ध होती. तर महापालिकेचे जे केंद्र शनिवारी बंद होते, तिथे आज (रविवारी) लस शिल्लक होत्या त्यामुळे फक्त १ हजार ७०६ जणांचेच लसीकरण झाले. त्यामध्ये ६८८ जणांनी पहिला डोस घेतला. तर १ हजार १८ जणांनी दुसरी लस घेतली. अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेता माघारी जावे लागले.

महापालिकेला रविवारी ३५ हजार कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर महापालिकेने १८२ केंद्रांवर लस पुरविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी शहरातील सर्व केंद्रांवर लस उपलब्ध असल्याने लसीकरण सुरळीत होईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महिन्याभरात १० हजारांपेक्षा कमी लसीकरण झालेले दिवस

२८ मार्च - १००५

४ एप्रिल - ८०२३

१८ एप्रिल - ८४१२

२४ एप्रिल - ५३७०

२५ एप्रिल - १७०६