
Pune Festival 2023 : दिमाखदार सोहळ्याने पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन
पुणे : सुमधुर सनईवादन... ४० व्यक्तींच्या पथकाचे एकत्रित शंखवादन... ‘कलात्मक योगासनां’ची चित्तथरारक प्रात्याक्षिके... नवरसांचा आविष्कार करणारी ‘सीता’ ही नृत्यनाटिका... लावण्यांची अदाकारी... अंगावर रोमांच उभा करणारी देशभक्तीपर गीते, अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी रसिकांनी अनुभवली. निमित्त होते, ३५ व्या पुणे फेस्टिव्हलच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याचे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मांदियाळीनंतर राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. याप्रसंगी फेस्टिव्हलच्या पॅट्रन आणि ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना व खासदार हेमामालिनी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रजनी पाटील,
श्रीरंग बारणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार रमेश बागवे, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
‘‘सतत ३५ वर्षे एवढा मोठा महोत्सव सातत्याने सुरू ठेवणे, सोपे नाही. या सातत्यासाठी सुरेश कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे, तितके कमीच आहे’’, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. ‘‘सुरेश कलमाडी यांच्याकडे मोठे ‘व्हिजन’ आहे. त्यातून हा महोत्सव उभा राहिला. त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे, अशी मी गणरायाकडे प्रार्थना करतो’’, असे पाटील म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, ‘‘पुणे फेस्टिव्हलबाबत मला उत्सुकता होतीच. गतवर्षी आमंत्रण होते, पण काही कारणांमुळे येऊ शकलो नाही. मात्र इथून पुढे दरवर्षी मी या कार्यक्रमाला येणार. सांस्कृतिक विश्वाला दिशा देणारा हा महोत्सव आहे.’’ यावेळी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांना ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘फेस्टिव्हलला येण्यासाठी पर्यटन खाते’
‘‘मला अनेक वर्षांपासून पुणे फेस्टिव्हलला यायचे होते. आमंत्रण कधी येईल, याची मी वाट पाहत होतो. शेवटी मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्हाला पर्यटन मंत्री व्हावे लागेल, पुणे फेस्टिव्हला जायचे असेल तर तो एकच पर्याय आहे. त्यासाठी त्यांनी माझे क्रीडा खाते काढून घेतले आणि पर्यटन खाते दिले. त्यामुळे यावर्षी मी फेस्टिव्हलला येऊ शकलो’’, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी गंमतीशीर पद्धतीने सांगताच सभागृहात हशा उसळला.
‘ड्रीम गर्ल’ला मानवंदना
ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना व खासदार हेमामालिनी या पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून दरवर्षी सातत्याने फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत. फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच, त्यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपट गीतांवर आधारित ‘गोल्डन इरा ऑफ ड्रीम गर्ल’ हा खास नृत्याविष्कार सादर झाला. या नृत्याविष्कारानंतर मंचावर आलेल्या हेमामालिनी यांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.
पुण्याचे ब्रँडिंग व्हावे आणि येथील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. सलग ३५ वर्षे सुरू असलेला हा फेस्टिव्हल आता पुण्याचे सांस्कृतिक वैभव आहे. यापासून प्रेरणा घेऊन देशात अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरू झाले, ही आनंदाची बाब आहे.
- सुरेश कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष