मेट्रोकडे थकले सांडपाणी वाहिनीचे ३७ लाख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

 वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या कामामुळे कर्वे रस्ता भागातील सांडपाणी वाहिनी फुटल्याने नव्याने वाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठीचे ३७ लाख रुपये महामेट्रोने दिले नसल्याचे महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले.

पुणे - वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या कामामुळे कर्वे रस्ता भागातील सांडपाणी वाहिनी फुटल्याने नव्याने वाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठीचे ३७ लाख रुपये महामेट्रोने दिले नसल्याचे महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. महापालिका आणि मेट्रो यांच्यात समन्वय नसल्याने अशा घटना घडत आहेत, याकडे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्ष वेधण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांडपाणीवाहिन्या फुटल्याने अभिनव चौक, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्त्याचा काही भाग, गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरून लोक हैराण झाले आहेत. याबाबत तक्रारी करून त्याकडे काणाडोळा होत असल्याचा मुद्दा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी उपस्थित केला. 

नंदा लोणकर विरुद्ध वसंत मोरे 
कोंढवा आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या श्रेयावरून मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांच्या सभेत जोरदार वाद झाला. ‘लोकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मात्र, काही जण उगाचच श्रेय घेत आहेत, अशी टीका लोणकर यांनी मोरे यांच्या नावाचा उल्लेख न करता केला. त्यानंतर मोरे यांनी लोणकरांचे आरोप खोडून काढले. त्यानंतर ‘चमकोगिरी’ या शब्दावरून दोघांमधील वाद वाढला. त्यात मध्यस्थी करीत अन्य सदस्यांनी वाद मिटविला.

मेट्रोच्या कामांमुळे येथील ड्रेनेजलाइन खराब झाली आहे. सध्या या ठिकाणी १० इंची लाइन आहे. मात्र, ती बदलून आता १८ इंच लाइन टाकण्याचे नियोजन आहे. त्यासाठीच्या ७० लाख रुपये खर्चापैकी ३७ लाख रुपये मेट्रो देणार आहे. तशी सूचना केली आहे. मात्र, अद्याप ते मिळालेले नाहीत.
- व्ही. जी. कुलकर्णी,  पाणीपुरवठा विभागप्रमुख,  पुणे महापालिका

‘डायनोसॉर पार्क’चा प्रस्ताव मंजूर
डहाणूकर कॉलनीतील दिवंगत बाळासाहेब ठाकरे उद्यानात लहान मुलांसाठी ‘डायनोसॉर पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या पार्कमध्ये डायनोसॉरच्या पाच प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी सांगितले. येथील पावणेचार एकरांत महापालिकेने ठाकरे उद्यान उभारले आहे. तेथे लहान मुलांसाठी ‘डायनोसॉर पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला होता. त्यात ११ ते १५ फूट उंचीचे डायनोसॉरच्या प्रतिकृतींचा समावेश असेल. तसेच त्याचे शेपूट, तोंड आणि डोळे यांच्या हालचाली होणार असून, त्याला ‘साउंड इफेक्‍ट’ची जोड दिली जाणार आहे, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 lakhs of sewage channel exhausted towards the metro