41 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना विषबाधा झाली. चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 37 जणांना तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले असून 4 विद्यार्थ्यांना मंचर येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. 
 

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना विषबाधा झाली. चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 37 जणांना तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले असून 4 विद्यार्थ्यांना मंचर येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे.

येथील विद्याधाम हायस्कूल शनीवार ( ता. 22 ) सकाळी वेळेत भरले होते. शालेय पोषण आहारासाठी मसाले भात बनविण्यात आला होता. हा मसाले भात मुलांना खाण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर थोड्या वेळाने काही मुलांना चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार सुरू झाला. या दरम्यान, पालक बैठकही आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे शिक्षक व पालकांनी तातडीने मुलांना खाजगी रूग्णालयात नेले. शिरूर येथील तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांना या बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळी कवठे येमाई येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. नामदेव पानगे व त्यांचे सहकारी येथे पोहचले. यावेळी त्यांनी 37 जणांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविले. श्रावणी ननवरे, अजिंक्य दळवी, ऋतूजा खैरे, अश्विनी जगदाळे या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. दुपारी त्यांना मंचर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले असल्याची माहिती मिळाली. विषबाधा झालेला भात शाळेमागे फेकून देण्यात आला होता. या ठिकाणी कचऱ्यात अर्धा पोते तांदुळ फेकून देण्यात आल्याचे दिसून आले. 

''नेहमी प्रमाणे आहार बनविताना मी तेथे हजर होतो. आहाराचा नवीन तांदूळ आल्याने तो देखील पाहून उतरवून घेतला. मुलांनी भातात वास येतो, चक्कर, डोके दुखणे व उलट्या या बाबत माहिती दिली. त्यावेळी तत्काळ तो भात फेकून दिला. 
प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली.'' 
-  मच्छिंद्र माने,मुख्याध्यापक विद्याधाम हायस्कूल, कान्हूर मेसाई 

''अस्वच्छता व योग्य प्रकारे आहार बनविण्याची काळजी घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली असावी. दरम्यान या बाबत शालेय स्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई करणार. त्या पाठोपाठ शालेय पोषण तयार करण्याचे काम काढून घेतले जाईल.  
- भास्कर पुंडे, विद्याविकास मंडळ, अध्यक्ष

''माहीती मिळताच घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी 41 मुलांना बाधा झाली होती त्यावेळी तपासणी करून 37 जणांना घरी पाठवले. 4 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. येथील सर्व शालेय पोषण आहाराचे साहित्य तपासले जाईल. त्यानुसार चौकशी करून अहवाल दिला जाईल.''
- बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षण अधिकारी, शिरूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 student poisoned by nutrition diet in Shirur taluka