आयुक्तालयासाठी केवळ ४२ वाहने

RK-Padmanabhan
RK-Padmanabhan

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे क्षेत्रफळ ५१८ चौ. किलोमीटर आहे, तर पुणे आयुक्‍तालय त्यापेक्षा कमी आहे. पिंपरीत नवीन आयुक्‍तालयासाठी पुण्याच्या तुलनेत जादा वाहने देण्याची आवश्‍यकता होती. पुणे पोलिसांकडे ८६६ चारचाकी वाहने आहेत, तर पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाकरिता केवळ ४२ वाहने आहेत. यापैकी बहुतांश वाहने बंद पडत असल्याने अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची वाहने वारंवार बंद पडतात. सोमवारी अपर आयुक्‍त आणि दोन उपायुक्‍तांची वाहने बंद पडली. यामुळे इतर वाहनांमधून त्यांना प्रवास करावा लागत असल्याचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

अवैध वाहतुकीवर कारवाईचे आदेश
चिंचवड स्टेशन येथून मुंबईला होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच चाकण येथीलही अवैध वाहतुकीबाबत तक्रारी आल्या आहेत. यामुळे आपण संबंधितांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.

निर्दोष व्यक्‍तींना गोवणार नाही
तळेगाव येथील किशोर आवारेवर मारहाण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यावेळी घटना घडली त्या वेळी आवारे इतर ठिकाणी होते. तसा पुरावाही त्यांनी सादर केला आहे. तो पुरावा खरा आहे, की खोटा याची तपासणी केली जाईल. जर गुन्ह्यात त्यांचा सहभाग नसला तर अटक केली जाणार नाही. मात्र, गुन्ह्यातील सहभाग आढळल्यास कोणालाही सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. सांगवी येथील मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले.

रामराज्य आले काय?
नागरिकांनी तक्रारी कराव्यात यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल आणि हौसिंग सोसायट्या येथे तक्रार पेटी ठेवण्यास सांगितले होते. मात्र, बहुतांश पेट्यांमध्ये तक्रारी आल्या नाहीत. यामुळे सर्व सुरळीत सुरू असून रामराज्य आले काय, असा प्रश्‍न मला पडला आहे. समन्वयामध्ये काहीतरी गडबड असल्याने तक्रार पेटीला प्रतिसाद मिळत नसावा, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्‍त केली. तसेच दिवाळीच्या काळात कर्मचारी सुटीवर होते. आता ते परत कामावर आल्याने पुन्हा चौकामध्ये सुरू असलेली पोलिसांची उपस्थिती यापुढील काळात कायम दिसेल. आपण स्वतः याबाबत तपासणी करणार असल्याचे आयुक्‍त पद्मनाभन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com