
'पीएमआरडीए'तर्फे पालिकेकडे ४३७ भूखंड वर्ग
पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील विकासासाठी आवश्यक असलेले ४३७ भूखंड पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सोमवारी (ता.२५) वर्ग केले आहेत. यामुळे आतापर्यंत केवळ जागेअभावी रखडलेल्या समाविष्ट गावांमधील विकासकामांना चालना मिळू शकणार आहे. हे भूखंड या गावांमधील अंतर्गत रस्ते, विकास आराखडा (डीपी) आणि प्रादेशिक आराखड्यातील (आरपी) रस्ते व अन्य पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागू शकणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
राज्याच्या नगर विकास विभागाने याबाबत ४ अॉक्टोबर २०१७ च्या अध्यादेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावे समाविष्ट झाली होती. या अकरा गावांमध्ये (लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडे सतरा नळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांचा समावेश होता. त्यानंतर ३० जून /२०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे आणखी पुणे महानगरपालिकेमध्ये २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
सन २०२१ मध्ये समाविष्ट केलेल्या गावांमध्ये म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली आदींचा समावेश आहे.
'पीएमआरडीए' कडून पालिकेकडे वर्ग करण्यात आलेल्या एकूण भुखंडांपैकी अंतर्गत रस्त्यांसाठी १०१ भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्रांसाठीच्या प्रत्येकी १६८ भूखंडांचा समावेश आहे.
पालिकेकडे वर्ग केलेले भूखंड व क्षेत्र
- अंतर्गत रस्ते - १०१ - १ लाख १५ हजार ९५०.२० चौरस मीटर.
- विकास/ प्रादेशिक आराखड्यातील कामे - १६८ - १ लाख ६३ हजार १७२.६९ चौरस मीटर.
- सुविधा क्षेत्र - १६८ - २ लाख ३७ हजार ३४८.३६ चौरस मीटर.
Web Title: 437 Plots Were Given To Municipality By Pmrda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..