पाणीपट्टीचे 468 कोटी थकीत ; महापालिकेपुढे वसुलीचे आव्हान

468 Crore bill pending of water
468 Crore bill pending of water

पुणे : मिळकतीचे मालक बदलले, मीटर जागेवर नाही, नोटिशीला प्रतिसाद नाही, अशा विविध कारणांमुळे पाणीपट्टीची सुमारे 468 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे आहे. लोक न्यायालयात तडजोडीत प्रकरण मिटविण्यासाठी ठेवल्यानंतरही मिळकतदार प्रतिसाद देत नाहीत. यामुळे आता ही वसुली करण्यासाठी संबंधित मिळकतीवरच थकबाकीचा बोजा चढविण्याचा विचार प्रशासन करीत आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी आकारली जाते. पूर्वी शहरात काही भागांत पाणीपट्टी मीटरनुसार आकाराली जात होती. मीटर फॉल्टी असल्याचा दावा करीत मिळकतदार पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात. तात्पुरत्या स्वरुपाचे किंवा कायमस्वरुपी असेही मीटर बसविले जातात. तात्पुरत्या स्वरुपाचे मीटर काढून घेतल्यानंतरही त्या मिळकतीला पाणीपट्टीची बिले दिली गेली. काही मिळकतींचे मालक हे जागा विकून दुसरीकडे गेले; परंतु त्यांच्या नावाची थकबाकी दिसत आहे. अशा थकीत बिलांवर व्याजाच्या रुपाने दंड आकारणी केली जाते. त्यामुळे थकबाकीचा आकडा हा दरवर्षी वाढतच जात आहे. 

ही थकबाकी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून लोकन्यायालयाचा मार्ग अवलंबिण्यात येत आहे. लोकन्यायालयात बिलाचा वाद दाखल करून संबंधित मिळकतदाराला हा वाद तडजोडीत म्हणजे दहा टक्के सवलत देऊन तो मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात सुनावणीसाठी महापालिकेने 381 जणांना नोटीस दिली होती. त्यापैकी केवळ पाच जण तडजोडीसाठी आले. या कारणामुळे थकबाकी कशी वसूल करावी, असा प्रश्‍न पाणीपुरवठा विभागाला पडला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित मिळकतीवरच थकबाकीचा बोजा चढविण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे. 

पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्या मिळकतीवरच बोजा चढविण्याचा पर्याय असून, तसा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीसमोर मांडून मान्य करून घ्यावा लागेल. थकबाकी वसुलीमधील तांत्रिक अडचणींचा विचार करणे आवश्‍यक वाटते. 

- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

आकडे बोलतात 

पाणीपुरवठा विभागाकडे नोंद असलेल्या नळजोडांची संख्या : 1 लाख 2 हजार 
सध्या प्रत्यक्षात पाणीपट्टी आकारणी होणाऱ्या मिळकतींची संख्या : 39 हजार 130 
मिळकत करासोबत पाणीपट्टी भरण्यासाठी वर्ग झालेल्या मिळकतींची संख्या : 58 हजार 
घरगुती वापराच्या नळजोडाची थकबाकी : 137 कोटी 57 लाख रुपये 
व्यावसायिक वापराच्या नळजोडाची थकबाकी : 330 कोटी 15 लाख रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com