
Measles Infection : राज्यात गोवरच्या 49 नवीन रुग्णांचे निदान
पुणे : राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये गोवरच्या नवीन रुग्णांची संख्या 49 ने वाढली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गुरुवारी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत गोवरच्या निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या 456 झाल्याचेही आरोग्य खात्याने अधिकृतपणे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
राज्यात गेल्या वर्षीपासून गोवरच्या साथीचा उद्रेक झाला आहे. नऊ महिने ते पाच वर्षांच्या मुला-मुलींमध्ये हा आजार झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे. राज्यामध्ये गेल्या वर्षभरात गोवरच्या साथीचे 215 उद्रेक झाले.
त्यात 22 हजार 333 गोवरचे संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी एक हजार 819 निश्चित निदान झालेले रुग्ण नोंदण्यात आले. राज्यात गेल्या 53 दिवसांमध्ये 12 ठिकाणी नोंदलेल्या उद्रेकातून 456 रुग्ण आढळल्याची माहिती गुरुवारी आरोग्य खात्याने दिली.
या आजाराचे 407 रुग्ण बुधवारी (ता. 22) नोंदले होते. त्यामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये 49 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गोवरच्या उद्रेकाची माहिती देणारी प्रसिद्धी पत्रक आरोग्य खात्यातर्फे दररोज प्रसिद्ध करण्यात येते.
त्यात ही माहिती देण्यात आली. या बाबत अधिक माहिती आणि स्पष्टीकरणासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी ‘सकाळ’ने दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आरोग्य खात्यातील अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या म्हणाल्या, “ही माहिती देण्याचा कोणताही अधिकार मला नाही. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालकांकडून अधिकृत माहिती तुम्हाला मिळाले.”
त्यानंतर आरोग्य खात्याचे संचालक डॉ. नितीन अंबडेकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा रात्री नऊ वाजता प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गोवरच्या अचानक झालेल्या रुग्ण वाढिबद्दल अधिकृत माहिती सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.
दरम्यान, अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गोवरचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत जातात. गोवरचे निश्चित निदानासाठी काही दिवस लागतात. गेल्या काही दिवसांचे प्रयोगशाळा नमुन्यांचे अहवाल मिळाल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.
मात्र, हा यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा विषाणूजन्य आजार आहे. वेळेत निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यातून कोणत्याही बाळाचा मृत्यू होणार नाही, याची प्रकर्षाने खबरदारी घेण्यात येत आहे.
आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेली माहिती बालरोगतज्ज्ञ आणि राज्याच्या गोवर प्रतिबंधक कृती समितीचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी पाठवून त्यांची त्यावर प्रतिक्रिया घेतली. ते म्हणाले, “ऋतू बदलताना फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान लहान मुलांमध्ये गोवरचा संसर्ग वाढतो.
राज्यात 49 जणांना झालेला संसर्ग याच प्रकारे झाला असावा, अशी शक्यता आहे. पण, पालकांनी घाबरून न जाता गोवरच्या लशीचे वेळेत डोस घ्यावे. त्यातून निश्चित गोवर प्रतिबंध करता येतो.” “9 ते 12 महिने वयाच्या मुलांना गोवर प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जातो. 15 ते 24 महिने वयाच्या मुलांना दुसरा डोस दिला जातो.
पहिल्या डोसनंतर 80 टक्के तर दुसऱ्या डोसनंतर 97 टक्के संरक्षण मिळते. गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून समाजात सतत गोवर-विरोधी 95 टक्के प्रतिकारशक्ती टिकून राहाणे आवश्यक असते. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या या दोनही लसीकरणाचे प्रमाण सातत्याने 95 टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते,”
गोवरबद्दल महत्त्वाचे...
- गोवर प्रतिबंधक लस, पोषक आहार आणि ‘अ’ जीवनसत्त्व या गोष्टी गोवरच्या बाबतीत महत्त्वाच्या असतात.
- गोवरच्या आजारात चौथ्या दिवशी पुरळ दिसते. सहाव्या दिवसानंतर ताप हळूहळू कमी होतो. पण उतरणारा ताप पुनः आला, खोकला, दम अशी लक्षणे दिसू लागली तर न्यूमोनियाची शक्यता असते.
- गोवरनंतर पुढच्या काही आठवड्यात मूल कुपोषित होण्याची खूपच शक्यता असते. त्यामुळे या काळात मुलांना सकस आहार मिळेल याकडे पालकांनी लक्ष द्यावे.
- कोरोना काळात मुलांच्या लसीकरणाची टक्केवारी घटली. ज्या भागात लस न मिळालेली अनेक मुले साचली, त्या भागात गोवरचा उद्रेक झालेला दिसतोय प्रमोद जोग, सदस्य, गोवर प्रतिबंध कृती समिती