पुण्यातील 51 गणेशोत्सव मंडळे करणार 'विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ' 

51 Ganeshotsav Mandals in Pune to perform Vighnaharta Raktadan Mahayagya
51 Ganeshotsav Mandals in Pune to perform Vighnaharta Raktadan Mahayagya

पुणे : कधी सामाजिक प्रश्‍न, तर कधी वैज्ञानिक कथा देखाव्यांच्या माध्यमातून लाखो भाविकांपर्यंत पोचवीत त्यांचे प्रबोधन करण्याचे काम पुण्यातील गणेशोत्सव मंडळे दरवर्षी करतात. यंदा मात्र गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा उत्सवी स्वरूप नक्कीच नाही. मात्र शहरातील तब्बल 51 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी रक्तपुरवठ्याची वाढती गरज लक्षात घेऊन "विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ' हा उपक्रम राबविला जाणार आहे. या महायज्ञाद्वारे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी झगडणाऱ्या आरोग्य विभागाला मदतीचा हात दिला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांकडून देखावे सादर करताना केवळ मनोरंजन उद्देश न ठेवता भाविकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांच्यात सजग दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने देखावे तयार करून भाविकांचे प्रबोधन केले जाते.यावर्षीही गणेशोत्सवामध्ये कोणते देखावे करायचे, कोणता सामाजिक संदेश द्यायचा, याबाबत गणेशोत्सव मंडळांकडून सहा महिन्यांपूर्वीच तयारी करण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र मार्चमध्ये येऊन धडकलेल्या कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण गणित बिघडले. त्याचबरोबर यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर मंडळांनी भर देण्याचे ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. 

दरम्यान,शहरातील छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येत रक्ताची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील 51 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडळात किंवा दोन ते तीन मंडळांनी एकत्र येऊन "विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ' घेण्याचे ठरविले आहे. हे शिबिर 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्ये मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांकडून रक्तदान केले जाणार आहे. त्याद्वारे शहरातील आरोग्य व्यवस्थेला गणेशोत्सव मंडळांकडून मदतीचा हात दिला जाणार आहे. धनकवडीतील आदर्श मित्र मंडळ, येरवडा येथील अष्टविनायक मित्र मंडळ, बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, महाराष्ट्र तरुण मंडळ, सेवा मित्र मंडळ, गणेश पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळ, नाना पेठेतील भैरवनाथ तरुण मंडळ अशा 51 गणेशोत्सव मंडळांचा त्यामध्ये सहभाग आहे. 

"यंदा देखावा किंवा अन्य उपक्रम नाहीत. त्यामुळेच सर्व मंडळांनी एकत्र येऊन रक्तदान महाशिबीर घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे रुग्णांना रक्ताची भासणारी गरज पूर्ण होऊ शकेल. 
'' हनुमंत शिंदे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र तरुण मंडळ, बुधवार पेठ 

यंदा गणेश प्राण-प्रतिष्ठापना सकाळसोबत

"गणेशोत्सव मंडळे वर्षभर विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवितात. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. साध्या पद्धतीने उत्सव साजरा करतानाच मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आरोग्य व्यवस्थेला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी 51 मंडळे एकत्र आली आहेत.''
पियुष शहा, अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट

विघ्नहर्ता रक्‍तदान महायज्ञाची वैशिष्ट्ये 
- एकाच दिवशी, एकाचवेळी 51 ठिकाणी भरणार रक्तदान शिबिर 
- नामवंत व मोठी मंडळे देखील या शिबिरात घेणार सहभाग 
- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व पोलिसांच्या सर्व नियमांचे केले जाणार पालन 
- मंडळांच्या कार्यकर्त्यांसह तरुण रक्तदात्यांचा सहभाग असणार 
- सर्व ठिकाणच्या रक्तदात्यांची मंडळे एकत्रित संख्या जाहीर करणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com