भाजपच्या 57 नगरसेवकांचीच गाऱ्हाणी; महापालिका प्रशासन निधी देत नसल्याच्याही तक्रारी अन्‌ नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

महापालिकेच्या निवडणुका सव्वा वर्षावर आल्याने त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे.मात्र,प्रभागातील कामांसाठी भाजपच्या नगरसेवकांना यंदा पाचऐवजी दोनच कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले

पुणे - पिण्याचे पुरेसे पाणी नाही, पावसात घरादारांत पाणी शिरत आहे, सीमाभिंती बांधत नाहीत, ड्रेनेज लाइन तुंबल्या आहेत, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडून आहेत, गल्लीबोळ अतिक्रमणांनी वेढले आहेत...ही गाऱ्हाणी सामान्य पुणेकरांची नाहीत! ती आहेत, आपल्या नगरसेवकांची आणि तेही महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या. भाजपच्या 57 नगरसेवकांनी ही गाऱ्हाणे महापालिका आयुक्तांपुढे मांडली आहेत. 

दुसरीकडे, लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी आम्हाला सोडवाव्याच लागणार आहेत. पण प्रशासन निधीही देत नाहीत, याकडेही नगरसेवकांनी आयुक्त विक्रम कुमार यांचे लक्ष वेधले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यात राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रभागांच्या पातळीवरील कामांवरही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल आणि खातेप्रमुख उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍नांचा भडीमार 
महापालिकेच्या निवडणुका सव्वा वर्षावर आल्याने त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रभागातील कामांसाठी भाजपच्या नगरसेवकांना यंदा पाचऐवजी दोनच कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून काही नगरसेवकांनी म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षांत केलेल्या कामांची बिलांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षात काही नगरसेवकांनी नवा पैसाही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरूनही नगरसेवकांत नाराजी असल्याचे बैठकीत उघड झाले. प्रभागांची हद्द पाहता, एवढ्या कमी निधीत कामे कशी करायची, असा प्रश्‍नांचा भडिमार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर केला. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरांतील सर्व प्रभागांमधील आवश्‍यक ती कामे करण्यात येणार आहेत. त्यातील अडचणी जाणून घेऊन उपाय शोधण्याच्या उद्देशाने बैठकीत चर्चा झाली आहे. पुढच्या टप्प्यांत उर्वरित नगरसेवकांशी चर्चा केली जाईल. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

नगरसेवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढील 15 दिवसांत कार्यवाही केली जाईल. या प्रक्रियेत प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधून त्यांच्या प्रभागांमधील कामे मार्गी लावण्यातील येतील. 
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 BJP corporators have lodged these grievances with the pune Municipal Commissioner