दुष्काळातही ७० टन टोमॅटोच्या उत्पादनाला गवसणी

दुष्काळातही ७० टन टोमॅटोच्या उत्पादनाला गवसणी

परिंचे, ता. ४ : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील प्रतापराव विलासराव दुधाळ यांनी टोमॅटोचा आत्तापर्यंत चार तोडे घेतले. योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापनाच्या जोरावर दुष्काळातही ७० टन मालाचे उत्पादन निघाले. त्यास १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री झाली असून, साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. आता बाजारभाव वाढत असल्याने सुमारे आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. चार लाख रुपये खर्च वजा जाता मला बारा लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.


प्रतापराव दुधाळ यांनी सातत्य ठेऊन दर वर्षी उन्हाळ्यात टॉमेटोचे पीक घेत आहेत. या वर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये उन्हाच्या झळा तीव्र असताना त्यांची टॉमेटो शेती बहरली असून कमी बाजारभाव मिळाला तरी आत्तापर्यंत सात लाखांचे उत्पन्न मिळाले आहे अजून आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी बांधावर येत असून, रोख पैसे देऊन खरेदी केली जाते आहे. याबाबत धुमाळ यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, धुमाळ यांना दिलीप धुमाळ व रवींद्र धुमाळ हे दोन मोठे भाऊ शेती करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

अशी केली लागवड
* दोन एकर क्षेत्ररमध्ये अथर्व वाणाची निवड
* जमिनीची मशागत करून यामध्ये बेड तयार केले
* स्फुरद पालाश व मायक्रो न्यूट्रण तसेच शेणखताचा वापर
* बेड भरून ठिबक सिंचन अंथरले
* दोन सरीमध्ये साडेचार फुटाचे अंतर ठेवून मल्चिंग पेपरचा वापर
* झिकझॅक पद्धतीने वीस हजार रोपांची लागवड

चिकट व लाइट सापळ्यांचा वापर
लागवड झाल्यावर ह्युमिक ऍसिड, सिलिका, सीवीड एक्सट्रॅक्ट, किटकनाशके व बुरशीनाशकांच्या वेळोवेळी फवारण्या केल्या. रोपांच्या वाढीसाठी वेळोवेळी पाण्यातून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या रस शोषणारी कीड फूल कीड पांढरी माशी आदी आळसा व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चिकट व लाइट सापळ्यांचा वापर केला.

पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून हंगामी भाजीपाला पिकांची लागवड आम्ही करत आहोत. यामध्ये टोमॅटो स्ट्रॉबेरी, काकडी, ढोबळी मिरची, कलिंगड, टरबूज आदी पिके घेत असल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
- प्रतापराव धुमाळ, टोमॅटो उत्पादन


02293, 02294

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com