कोपर्डे हवेली : आजोबांची आरटीओ रन मध्ये दमदार कामगिरी..
७२ वर्षांच्या आजोबांची
‘आरटीओ रन’मध्ये दमदार कामगिरी
नातवंडांसह पाच किमी अंतर ३२ मिनिटांत केले पूर्ण
कोपर्डे हवेली, ता. ४ : वयाच्या ७२ व्या वर्षीही फिटनेस आणि उत्साहाने सगळ्यांना प्रेरणा देणारी घटना कऱ्हाडमधील आयोजित आरटीओ रन फॉर रोड सेफ्टी स्पर्धेत घडली. विद्यानगर सैदापूर येथील रहिवासी दस्तगीर शेख यांनी पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि अवघ्या ३२ मिनिटांत हे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे अरहान शेख आणि इनाया शेख हेही धावले आणि स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
या स्पर्धेत दस्तगीर शेख हे सर्वात वयस्कर धावपटू ठरले. वयाच्या या टप्प्यातही इतकी ऊर्जा आणि शिस्त कायम ठेवण्यामागे त्यांचा नियमित दिनक्रम असल्याचे ते सांगतात.
मी दररोज नियमित व्यायाम करतो, संतुलित आहार घेतो आणि दिवसभर पुरेसे पाणी पितो. याशिवाय वेळोवेळी डोंगर-गडांची सैर करतो, ज्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते, असे दस्तगीर शेख यांनी सांगितले.
शेख यांच्या या प्रेरणादायी कामगिरीची सर्वत्र चर्चा होत असून, सोशल मीडियावरून आणि विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वय हा फक्त आकडा असतो आणि नियमित मेहनतीने कोणत्याही वयात आरोग्य सुदृढ ठेवता येते, हे दस्तगीर शेख यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
02463
कऱ्हाड : आरटीओ रन यशस्वी पूर्ण केलेले ७२ वर्षीय दस्तगीर शेख.

