तळेगाव -चाकण महामार्गास तब्बल 734 शेतकऱ्यांचा विरोध

हरिदास कड ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

-खेड, मावळमधील शेतकऱ्यांचा समावेश
-खेडच्या नायब तहसीलदारांची माहिती

चाकण (पुणे) ः तळेगाव ते चाकण-चौफुला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक "548 डी'साठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींबाबत 734 शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. यात खेड तालुक्‍यातील 575, तर मावळ तालुक्‍यातील 159 शेतकऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती खेडचे नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांनी दिली.

चाकण-तळेगाव राज्यमार्ग क्रमांक 55 चे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. तळेगाव ते चाकण हा सहापदरी, तर चाकण ते चौफुला हा चारपदरी मार्ग होणार आहे. सुमारे एकशे सहा किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे. या मार्गाचे रुंदीकरण होताना मावळ तालुक्‍यातील 39 हेक्‍टर, तर खेड तालुक्‍यातून 110 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहतीमुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गाचे काम मार्गी लागल्यास या परिसरातील कोंडी दूर होण्याची शक्‍यता आहे.

याबाबत नायब तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले की, खेड व मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हरकती मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हरकतींचा सकारात्मक विचार करण्यात येईल. भूसंपादनास योग्य मोबदला देऊन या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

 

वर्षभरात काम मार्गी लागणार ः भेगडे
तळेगाव-चाकण-चौफुला या महामार्गाचे काम येत्या वर्षभरात मार्गी लावण्यात येणार आहे. हा मार्ग औद्योगिक वसाहत व इतर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भूसंपादनावरील हरकतींचा विचार, मूल्यांकन ठरविणे, मार्गाचे पुनःसर्वेक्षण व निविदा आदी प्रक्रिया झाल्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लागेल, असे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 734 farmers opposing talegoan-chakan highway