पुण्यात महागुंतवणूक; 18 हजार नोकऱ्यांची संधी 

मंगेश कोळपकर - सकाळ वृत्तसेवा 
Monday, 16 November 2020

"ऑटोमोबाईल',"आयटी' आणि सेवा क्षेत्राचे हब असलेल्या पुण्याला आता "लॉजिस्टिक्‍स' कंपन्याही पसंती देऊ लागल्या आहेत, हे आता अधोरेखित झाले आहे, असे विभागीय उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पुणे - दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात येत असलेले 15 पैकी 8 उद्योग पुण्यात येणार आहेत. त्यातील 5 उद्योग लॉजिस्टिक्‍स क्षेत्रातील आहेत. हे उद्योग 10 हजार 505 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून शहरात 18 हजार 482 जणांना थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योग क्षेत्राने या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे. 

"मॅग्नेटिक महाराष्ट्र'तंर्गत राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी 15 कंपन्यांशी करार केले आहेत. त्या कंपन्या राज्याच्या विविध भागांत 34 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या पैकी 8 कंपन्या पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडी भागात येणार आहेत. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. "ऑटोमोबाईल',"आयटी' आणि सेवा क्षेत्राचे हब असलेल्या पुण्याला आता "लॉजिस्टिक्‍स' कंपन्याही पसंती देऊ लागल्या आहेत, हे आता अधोरेखित झाले आहे, असे विभागीय उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्‍स कंपन्या केवळ सुट्या भागांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या नाहीत तर, आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या ग्राहकाला सर्व सुविधा एकाच छताखाली देणाऱ्या त्या कंपन्या आहेत. वेअर हौसिंग, कस्टम्स आणि मटेरिअल मॅनेजमेंटच्या सुविधा त्या देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पुण्याचा औद्योगिक चेहरा-मोहरा बदलू शकतो, असे मत "एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी'चे प्र- कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी व्यक्त केले. पुुणे आणि परिसरात "एमबीए'ची 100 पेक्षा जास्त तर, अभियांत्रिकीची 50 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या उद्योगांना नजीकच्या काळात कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्‍वास आहे, ही समाधानाची बाब आहे. कोरोनानंतरच्या काळात पुण्याचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे उद्योग येत आहेत. आता अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि कार्गोचा प्रश्‍न सुटावा, एवढीच अपेक्षा आहे. 
सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर- एमसीसीआयए 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 industries investment 18 thousand job opportunities in pune