

सेवा, शिक्षण आणि समर्पणाचे मूर्तिमंत रूप
विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बालकृष्णन जी यांच्या निधनाने राष्ट्रसेवेच्या एका प्रदीर्घ आणि तेजस्वी पर्वाची सांगता झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहणारा लेख.
.....................................................
फोटो ओळ. ए. बालकृष्णन जी
काही माणसे आपल्या संपूर्ण आयुष्याचेच रूपांतर एका मोठ्या ध्येयाच्या सेवेत करून घेतात. त्यांचे जीवन हाच त्यांचे संदेश असतो आणि त्यांचा प्रत्येक श्वास हा राष्ट्रकार्याला वाहिलेला असतो. ए. बालकृष्णन जी (३ मे १९३८ – २७ ऑगस्ट २०२६) हे अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्वांपैकी एक होते.
स्वामी विवेकानंदांचे विचार आणि राष्ट्रउभारणीचे उदात्त तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगणारे, विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बालकृष्णन जी यांच्या निधनाने राष्ट्रसेवेच्या एका प्रदीर्घ आणि तेजस्वी पर्वाची सांगता झाली आहे.
तरुणपणी त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. पुढे स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी आणि एकनाथजी रानडे यांच्या कार्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यांच्यातील सेवाभावाला व्यापक राष्ट्रीय ध्येयाची दिशा मिळाली. पुढे विवेकानंदांच्या विचारांनी त्या भावनेला एका व्यापक जीवनध्येयाचे स्वरूप दिले.
स्वामी विवेकानंदांनी दिलेले ‘मनुष्यनिर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थान’ हे जीवनसूत्र त्यांनी केवळ समजून घेतले नाही, तर जीवनाचे ध्येय बनवले. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या प्रत्यक्ष प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली १९७३ मध्ये प्रशिक्षित झालेल्या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता.
स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवणे, अहंकाराचे क्षालन करणे आणि एका व्यापक राष्ट्रीय ध्येयाशी स्वतःला जोडून घेणे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. तो त्यांनी जगण्याचा स्थायीभाव बनवला. त्याग, तपस्या, शिस्त, सेवा आणि निस्वार्थ राष्ट्रभक्ती या मूल्यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसत असे. त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रसेवा हा व्यवसाय नव्हता, पद नव्हते किंवा एखादा प्रकल्प नव्हता; ती त्यांच्या जीवनाची साधना होती.
बालकृष्णन जी यांच्या जीवनकार्याचा सर्वांत महत्त्वाचा आणि गौरवशाली अध्याय अरुणाचल प्रदेशात साकारला. १९७०च्या दशकात तो प्रदेश आजच्या तुलनेत अत्यंत दुर्गम, अविकसित आणि आव्हानात्मक होता. अशा परिस्थितीत तेथे जाऊन कार्य उभे करणे म्हणजे केवळ धाडस नव्हते, तर त्या भूमीशी आणि तेथील समाजाशी आत्मीय नाते जोडण्याची तपश्चर्याच होती.
बालकृष्णन जी यांनी तेथील समाजजीवन समजून घेतले. स्थानिक जनजातीय समुदायांशी संवाद साधला. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समजून घेतला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग शोधला. याच प्रयत्नांतून विवेकानंद केंद्राच्या निवासी शिक्षण पद्धतीची पायाभरणी अरुणाचल प्रदेशात झाली.
अरुणाचलमध्ये शैक्षणिक चळवळ
पहिल्या विद्यालयाची १९७७ मध्ये स्थापना झाली आणि पुढे विवेकानंद केंद्र विद्यालयांची एक प्रभावी शैक्षणिक चळवळ संपूर्ण अरुणाचल प्रदेशात उभी राहिली. ही केवळ शाळांची संख्या वाढण्याची कथा नव्हती. ही एका संपूर्ण पिढीला शिक्षण, संस्कार, आत्मविश्वास आणि राष्ट्रभावनेशी जोडण्याची प्रक्रिया होती.
दुर्गम भागातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणे, स्थानिक समाजाचा विश्वास संपादन करणे आणि शिक्षणाला संस्कारांची जोड देणे, या कार्यांत बालकृष्णन जी यांचे योगदान मोलाचे होते. अरुणाचल प्रदेश सरकारने त्यांना २०१४ मध्ये ‘स्टेट अवॉर्ड’ने सन्मानित केले. ज्यांनी आयुष्यभर प्रसिद्धीपासून दूर राहून काम केले, त्यांच्यासाठी पुरस्कार हा कधीच ध्येय नव्हता. त्यांच्या दृष्टीने खरा पुरस्कार होता, एखाद्या मुलाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल, एखाद्या कुटुंबाच्या जीवनात निर्माण झालेली आशा आणि राष्ट्राच्या भविष्यासाठी घडणारी एक सक्षम पिढी.
ईशान्य भारतात कार्याची भक्कम पायाभरणी केल्यानंतर बालकृष्णन जी यांनी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय कार्यातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. १९८१ ते २००१ या दोन दशकांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी केंद्राचे महासचिव म्हणून कार्य केले. देशात विवेकानंद केंद्राच्या शाखा, सेवा उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध योजना विस्तारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
धोरणात्मक मार्गदर्शन
त्यानंतर २००१ ते २०२० या काळात उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्राला धोरणात्मक मार्गदर्शन दिले. आणि २०२० पासून अखेरपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली.कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या विवेकानंद शिला स्मारकापासून ते हिमालयाच्या कुशीत आणि ईशान्य भारताच्या दुर्गम भागांपर्यंत—त्यांनी विवेकानंदांच्या विचारांना कार्यरूप देणारा एक विशाल सेतू उभा केला.
हा सेतू केवळ भौगोलिक नव्हता. तो भारताच्या विविध समाजघटकांना राष्ट्रीय भावनेने जोडणारा सेतू होता. राष्ट्रीय अध्यक्ष यासारख्या सर्वोच्च पदावर असूनही बालकृष्णन जी यांच्या व्यक्तिमत्त्वात पदाचा कोणताही अहंकार जाणवत नसे. ते अत्यंत साधे, शांत, संयमी आणि कमालीचे शिस्तबद्ध होते.
कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्या पदाचा मोठेपणा जाणवत नसे; उलट समोरच्या व्यक्तीबद्दलची आत्मीयता जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना जाणवते. खरे नेतृत्व हे अधिकार गाजवण्यात नव्हे तर ते माणसे घडवण्यात असते. त्यांनी संस्था उभी केलीच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांच्या पिढ्या घडवल्या. स्वतः पुढे जाण्यापेक्षा इतरांना पुढे नेणे, स्वतःचे नाव मोठे करण्यापेक्षा कार्य मोठे करणे आणि स्वतःसाठी काहीही न मागता आपले सर्वस्व राष्ट्राला अर्पण करणे,ही त्यांच्या जीवनाची ओळख होती.
कर्मयोगाचा प्रत्यय अनुभव
बालकृष्णन जींचे जीवन म्हणजे भगवद्गीतेतील कर्मयोगाचा प्रत्यक्ष अनुभव होते.कर्तव्य करायचे, पण त्याचा अहंकार बाळगायचा नाही.सेवा करायची, पण तिची अपेक्षा ठेवायची नाही.जबाबदारी स्वीकारायची, पण पदाचा गर्व करायचा नाही. आयुष्य जगायचे ते स्वतःसाठी नव्हे, तर एका व्यापक ध्येयासाठी. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी हे जीवनव्रत अखंडपणे जगले.
त्यांच्या जीवनाकडे पाहताना स्वामी विवेकानंदांचा संदेश पुन्हा आठवतो—भारताला केवळ विचारांची नव्हे, तर त्या विचारांना जीवनात उतरवणाऱ्या मनुष्यांची गरज आहे. बालकृष्णन जी यांनी हा विचार जगून दाखवला.
( लेखक अंबाजोगाई ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.