आदर्शगाव गावडेवाडी ग्रामपंचायतीला सलग सहाव्यांदा विमा ग्राम’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gawadewadi Vima Gram Award

आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीला सलग सहाव्यांदा सन २०२१ –२०२२ चा ‘विमा ग्राम’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

आदर्शगाव गावडेवाडी ग्रामपंचायतीला सलग सहाव्यांदा विमा ग्राम’ पुरस्कार

मंचर - आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीला सलग सहाव्यांदा सन २०२१ –२०२२ चा ‘विमा ग्राम’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह व एक लाख रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अश्या पद्धतीचा सलग सहा वेळा विमा ग्राम पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले गाव आदर्शगाव गावडेवाडी ठरले आहे.त्यामुळे गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व भारतीय विमा महामंडळाचे पुणे विभागाचे विक्री व्यवस्थापक बाळासाहेब केकरजवळेकर यांच्या हस्ते सरपंच स्वरूपा गावडे व उपसरपंच स्नेहल गावडे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी भारतीय विमा महामंडळाचे नारयणगाव येथील शाखा अधिकारी सुधीर कांत, उपशाखा अधिकारी आनंद ठाकूर, विकास अधिकारी सचिन भोसले, विष्णू हिंगे, देवदत्त निकम, ज्ञानेश्वर गावडे, देवराम गावडे व जगदीश पिंपळे उपस्थित होते.

विमाग्राम पुरस्कार मिळवण्यासाठी सहकार महर्षी बाळासाहेब चिमाजी गावडे व विमा प्रतिनिधी मच्छिंद्र गावडे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

वळसे पाटील म्हणाले, 'जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतःचा विमा काढावा. गावातील एकही व्यक्ती विम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी घ्यावी.' हनुमंत गावडे यांनी आभार मानले.

'भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत सलग सहावेळा ‘विमा ग्राम’ पुरस्कार मिळविण्याचा बहुमान देशात प्रथमच आदर्शगाव गावडेवाडी (ता.आंबेगाव) गावाला मिळालेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ७०० हून अधिक जणांचा येथे विमा उतरविण्यासाठी विमा प्रतिनिधी मच्छिंद्र गावडे यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंत गावातील विकास कामांसाठी सहा लाख रुपये रक्कम दिली आहे. अशी माहिती भारतीय विमा महामंडळाचे पुणे विभागाचे विक्री व्यवस्थापक बाळासाहेब केकरजवळेकर यांनी दिली.