

PNE26W41130
अहिल्यानगर ः महिला व बालविकास भवन (अहिल्याभवन) इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. समवेत आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी.
---------------
‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला बळ मिळणार
राधाकृष्ण विखे ः महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन
अहिल्यानगर, ता. ९ ः नारीशक्ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मातृशक्तीचे सक्षमीकरण झाल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. महिलांच्या उत्कर्षाचे काम ‘अहिल्याभवना’तून होणार असल्याने या नारीभवनाच्या माध्यमातून नारीशक्तीला बळकटी मिळणार असल्याचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महिला व बालविकास भवन (अहिल्याभवन) इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
विखे पाटील पुढे म्हणाले, भवनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका प्रभावीपणे करत आहेत. महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला, असेही त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी या इमारतीच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या कामाला निश्चितच गती मिळेल. विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राजळे यांनी ‘अहिल्याभवना’च्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे म्हटले.
----------
बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ
बचतगटांच्या उत्पादनांची विक्री केवळ स्टॉलपुरती मर्यादित न ठेवता त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिलांच्या यशोगाथा तयार करून त्या इतर महिलांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री विखे म्हणाले.
--------
१४ कार्यालये एकाच छताखाली
महिला व बालविकास अधिकारी संजय कदम म्हणाले, महिला व बालविकास विभागांतर्गत असलेली १४ कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची तसेच पैशांची बचत होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले आहे. जिल्ह्यातील २० हजार ६१६ बचतगटांना कर्जवाटप करण्यात आले आहे. प्रतिपालकत्व योजनेत ५४ कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.