

आळंदी, ता. २ : आळंदीतील इंद्रायणी नदीवरील चारही पुलांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची नावे देण्यास आळंदी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली असून, लवकरच शहरातील सर्व पूल माउली आणि त्यांच्या भावंडांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.
याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘‘श्रीक्षेत्र आळंदीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण निर्णय आळंदी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. इंद्रायणी नदीवरील शहरातील चारही पुलांना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या नावाने नामकरण करण्याच्या प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे जागतिक श्रद्धास्थान आहे. वर्षभर देश-विदेशातून लाखो भाविक आळंदीला भेट देतात. तर आषाढ व कार्तिक वारीच्या काळात लाखो वारकरी इंद्रायणी नदीच्या तीरावरून माउलींच्या दर्शनासाठी येतात. अशा पवित्र नगरीतील इंद्रायणी नदी ही केवळ जलप्रवाह नसून संत परंपरा, भक्ती, समता आणि अध्यात्म यांचे प्रतीक मानली जाते.
नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या विषयानुसार इंद्रायणीवरील चारही पुलांना संतश्रेष्ठ भावंडांची नावे देण्याबाबतचा विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अशी असतील नावे
- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पूल
- श्री निवृत्तीनाथ महाराज पूल
- श्री सोपानदेव महाराज पूल
- संत मुक्ताबाई पूल
या निर्णयामुळे शहराच्या प्रवेशद्वारांपासून ते इंद्रायणी नदी परिसरापर्यंत संतपरंपरेची ओळख अधिक ठळक होणार आहे. भविष्यात संबंधित पुलांवर नामफलक, दिशादर्शक फलक आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही नियमांनुसार करण्यात येणार आहे.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.