
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा या परिसराला आज शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला.
Aambegav Hail : आंबेगावच्या पुर्वभागाला गारपीटीचा जबरदस्त तडाखा; शेतातील पिकांचे लाखोंचे नुकसान
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा या परिसराला आज शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला असून रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशा खच पडला आहे गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज शनिवारी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सुपारीएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. गारांचा खच तयार झाला धामणी येथील द्रोणागिरीमळा, माळीमळा येथे गारपिटीचा तडाखा बसला. मंगेश नवले यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील तोडणीला आलेल्या खरबुज पिकाचे मोठे नुकसान झाले, जारकरवाडी येथील बढेकरमळा, ज्ञानेश्वरवस्ती येथेही जोरदार गारपीट झाली श्याम बढेकर यांच्या माऊली हायटेक नर्सरी मधील, मिरची, टोमॅटो, कलिंगड या पिकांचे सुमारे ७० हजार तयार रोपे गारपिटीने खराब झाल्याने एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे भगवान बढेकर यांच्या काकडीच्या पिकातहि गारांचा खच साचल्याने मोठे नुकसान झाले.

पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, द्रोणागिरीमळा, लाखणगाव,या भागातील शेतकरी कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेतात अगोदरच बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे त्यातच आज पडलेल्या गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रस्त्यावर शेतात, गोठ्यात सुमारे सहा इंच जाडीचा गारांचा थर साचला आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, धामणीचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, प्रतिक जाधव , अशोक वाळूंज, भगवान बढेकर, जयेश वाळुंज, महेंद्र वाळुंज, मंगेश नवले, सोमनाथ पोंदे व सुशांत रोडे यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली पोंदेवाडी परिसरातून जात असलेल्या रांजणगाव ओझर महामार्गावर गारांचा अक्षरशा खच पडला होता डांबरी रस्ता हा कश्मीर मधील रस्त्या सारखा पांढरा शुभ्र झाला होता नागरिक वाहने थांबवून मोबाइल मध्ये फोटो काढत होती.