'आप'च्या 'सिंहां'ना प्रिंटची एलर्जी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp sanjay singh

दूरचित्रवाणीचे कॅमेरे नसल्यामुळे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी चक्क पत्रकार परिषदच रद्द केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.१६) पुण्यात घडला.

'आप'च्या 'सिंहां'ना प्रिंटची एलर्जी

- अमोल अवचिते

पुणे - दूरचित्रवाणीचे कॅमेरे नसल्यामुळे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी चक्क पत्रकार परिषदच रद्द केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.१६) पुण्यात घडला. सिंह यांच्या या अजब वर्तणुकीमुळे प्रसार माध्यमातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खासदार सिंह पुण्यातील गणेश कला क्रीडा रंग मंच येथील सभेसाठी शुक्रवारी (ता. १६) आले होते. त्यापूर्वी सायंकाळी ४ वाजता नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघात आपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नियोजित वेळे आधीच आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेसाठी प्रमुख वृत्तपत्र संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आपच्या पदाधिकाऱ्यांनी ४.४५ वाजता, दूरचित्रवाणीचे प्रतिनिधी दिसत नसल्याचे कारण देत पत्रकार परिषद रद्द केल्याचे पत्रकारांना सांगितले.

त्यावर पत्रकार आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त करणे तर दूरच, त्यांना कोणताही खुलासा करता आला नाही. खासदार सिंह यांच्या सत्कारासाठी आणलेले हारतुरे, बुके सोबत घेत पदाधिकाऱ्यांनी गणेश कला मंचचा रस्ता धरला. दरम्यान, ‘सिंह आता गणेश कला मंच येथेच बोलतील. त्यामुळे तुम्ही आमच्या मागे या,’ असे सांगत पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

याबाबत, ‘फक्त वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, म्हणून पत्रकार परिषद रद्द करणे योग्य नाही’ असे राज्य संघटक आणि पुण्याचे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले. तसेच जे लोक तुमच्यासाठी आले, त्याचे काय? असा प्रश्न विचारला असता, त्यावर खासदार सिंह हे गणेश कला क्रीडा मंच येथे बोलणार आहेत, असे सांगत पुढे अधिक बोलण्‍याचे त्यांनी टाळले.

Web Title: Aap Party Pune Mp Sanjay Singh Reporter Conference Cancel Politics Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..