esakal | ‘आरोग्यम धनसंपदा’ या संकल्पने अंतर्गत विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव I Bank Employee
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरोग्यम धनसंपदा’ या संकल्पने अंतर्गत विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव

‘आरोग्यम धनसंपदा’ या संकल्पने अंतर्गत विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘जागतिक स्तरावर उद्भवलेल्या कोरोना या संसर्गामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले होते. या परिस्थितीमध्ये वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलिस यंत्रणेने अहोरात्र सेवा बजावली. त्यात बँक कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान ही दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोना काळात रुग्णांकडे पैसे नसते तर त्यांचे उपचार कसे झाले असते. या कठीण काळात देशाचे आर्थिक आरोग्य सांभाळण्याचे काम बँक कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांचा सन्मान होणे आवश्‍यक आहे.’’ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.  

शिवसमर्थ प्रतिष्ठान, बँक कर्मचारी संघ पुणे आणि पुणे ॲकॅडमी फॉर ॲडव्हान्स स्टडीज (पीएएएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्यम धनसंपदा’ या संकल्पने अंतर्गत विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदी डॉ. कराड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा एनवायसीएसचे राजेश पांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागपुरे, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, एनवायसीएसचे राजेश पांडे, धीरज घाटे, बँक कर्मचारी संघाचे सरचिटणीस बापू मानकर, पीएएएसचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, शि.प्र.मंडळीचे अध्यक्ष एस के जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

कराड म्हणाले, ‘समाजाच्या सर्व तळागाळातील लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या मदतीचा ओघ पोहोचविण्यासाठी बँकिंग यंत्रणा सक्षमपणे, निर्भयपणे, निःस्पृहपणे पुढे आली. अशा परिस्थितीमध्ये शहरातील ज्या ३२ बँक कर्मचाऱ्यांचे निधन झाले त्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. केंद्रातील नेतृत्व हे कणखर आणि निर्णय घेणारे असल्याने आरोग्याचे बजेट दुपटीने वाढवत ते दोन लाख चौतीस हजार कोटींपर्यंत वाढवून देण्यात आले आहे. कोरोनातून मिळालेल्या अनुभवामुळे महाराष्ट्रातील साडेपाचशे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजन प्लॅन्ट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने मंजूर केले. तसेच वैद्यकीय संसाधनांचे उत्पादन भारतात घेऊन आरोग्य यंत्रणा अद्ययावत आणि सक्षम केली.’’

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कोरोना काळात संघ प्रेरणेने आम्ही काम केले. संघावरील विश्वास व्यक्त करीत मदतीचे हजारो हात पुढे आले. कोरोना काळात सेवा बजावताना पुण्यातील जे ३२ बँक कर्मचाऱ्यांचे निधन झाले, त्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये सामावले जाईल.’’ त्याचबरोबर बँक कर्मचारी संघाने व दीपक नागपुरे यांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबीयांना कशी मदत होईल हे पाहण्याच्या सूचना देखील पाटील यांनी यावेळी दिल्या.

loading image
go to top