दिवाळी स्टोरी -आभाळमाया

दिवाळी स्टोरी -आभाळमाया
Published on: 

फायनल
----------------------------------
दिवाळी स्टोरी- तातडीने
००००००००००००००००००००००००००००००००००००००००

प्रक्रियेतून विस्तारली ‘आभाळमाया’
……………
एखाद्या भागात प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यानंतर त्याभोवती इकोसिस्टिम तयार होऊन त्याचे लाभ सर्वच घटकांना मिळतात. उद्योगाच्या मागणीनुसार शेतकरी शेतीमाल पिकवतात. चांगला भावही मिळतो. रोजगारही उपलब्ध होतो आणि त्या उद्योगाचीही भरभराट होते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील कोनड खुर्द येथील आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रक्रिया उद्योग. केवळ शासकीय अनुदानासाठी काम न करता प्रकल्प यशस्वीरीत्या चालवून त्याचा विस्तार करण्यासाठी कंपनीची टीम दिवसरात्र एक करत आहे. कुणी विचार केला नसेल अशी उत्पादने एका छोट्या गावात ही कंपनी तयार करते. विशेष म्हणजे कंपनीच्या उत्पादनांना केवळ देशातच नाही तर परदेशातही पसंती मिळत आहे.
---------------------------
अनिल जाधव
-----------
बुलडाणा प्रगतिशील शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी बीजोत्पादन घेतात. तसेच फळबागांचीही लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सरकारनेही फळबागा लागवडीसाठी अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या. पण मूल्यसाखळी आणि प्रक्रियेचा अभाव होता. जिल्ह्यात अनेक बियाणे कंपन्या स्थापन झाल्या. पण फळ प्रक्रिया उद्योग उभे राहिले नाहीत. भाव नसल्याने शेतकरी फळबागा काढत होते. एकेकाळी जिल्ह्यात संत्र्याचे मोठे क्षेत्र होते. पण पीक कालांतराने मागे पडत गेले. मूल्यसाखळी आणि प्रक्रियेचा अभाव असल्याने आता जिल्ह्यातून संत्रा पीक हद्दपार झाल्यात जमा आहे. मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात डाळिंब, पेरू, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट, आंबा आदी फळपिकांच्या लागवडी झाल्या. त्यामुळे उत्पादन, विक्री आणि प्रक्रिया या टप्प्यांवर काम करण्यासाठी संधीही निर्माण झाल्या. याच संधी लक्षात घेऊन चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथे फळ प्रक्रियेचे बीज रोवले गेले. आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून फळ आणि मका प्रक्रियेचे रोपटे हळूहळू आकार घेत आहे. केवळ डाळिंब, पेरू आणि सीताफळच नाही तर जिल्ह्यात न पिकणारा केसर, तोतापुरी आणि हापूस आंबा, तसेच जांभळावर प्रक्रिया केली जाते. फ्रोझन स्वीट काॅर्नचीही निर्मिती केली जाते. लागणारा जास्तीत जास्त माल शेतकऱ्यांकडून घेण्याला प्राधान्य दिले जाते. परिसरातील शेतकरीही कंपनीची मागणी लक्षात घेऊन पीक पद्धती बदलताना दिसत आहेत. आभाळमाया कंपनी केवळ राज्यातच नाही तर परराज्यात आणि विदेशातही आपली उत्पादने पाठवत आहे. कोनड परिसरात या कंपनीमुळे उत्पादन ते प्रक्रिया साखळी विकसित होत असून तीच्या कक्षाही रुंदावत आहेत. आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहिली ती उच्चशिक्षित राजीव जावळे यांच्या संकल्पनेतून. राजीव हे एमएसस्सी ॲग्री झालेले. एका बहुराष्ट्रीय बियाणे कंपनीत सरव्यवस्थापक पदावर ते काम करत होते. याच काळात वडिलांचे निधन झाले आणि त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर त्यांनी शेतात पेरूची लागवड केली. दर्जेदार उत्पादन घेतल्यानंतरही हाती येणारा भाव कमी होता. त्यामुळे त्यांनीच फळ प्रक्रियेत उतरण्याचे ठरवले. परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र आणले. आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. कंपनीची सभासद संख्या १,१९५ वर पोहोचली आहे. कंपनीचा पसारा जसजसा वाढत गेला तसे शेतकऱ्यांचाही आत्मविश्वास वाढल्याचे राजीव सांगतात.

गोदाम निर्मितीपासून सुरुवात ः
शेतीमालाची मूल्यसाखळी विकास किंवा प्रक्रिया करायची म्हटल्यास पहिली पायरी आहे ती साठवणीची. साठवणुकीची सुविधा असल्यास शेतकरी चांगल्या बाजारभावासाठी थांबू शकतात. अशी सुविधा नसल्यास कमी भावातही विक्री करावी लागते. त्यामुळे शेतीमाल आधारित इकोसिस्टिम उभारायची असल्यास साठवणीची व्यवस्था गरजेची असते हे ओळखून आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीने २०२१-२२ मध्ये स्मार्ट प्रकल्पातून ३६० टन क्षमतेचे गोदाम उभारले. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल ठेवण्यासाठी व्यवस्था झाली. पण त्यापुढेही जाऊन कंपनीने शेतकऱ्यांना गोदामात ठेवलेल्या शेतीमालावर कर्जे उपलब्ध करून दिली. जावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून गोदामात ठेवलेल्या मालावर शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागली. गोदाम आणि पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल साठवण्याची आणि त्यावर कर्जे घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. गोदाम उभे राहिल्यानंतर पुढे काय करावे? याची चाचपणी सुरूच होती. त्या वेळी ‘ॲग्रोवन’मधून फळ प्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा वाचली आणि तिथून प्रेरणा मिळाल्याचे राजीव जावळे सांगतात.

‘मॅग्नेट’मधून प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी ः
आपल्या पेरू आणि सीताफळावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट राजीव आणि त्यांच्या टीमच्या गाठीशी कायम होते. परंतु प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणूक मोठी लागते. कंपनीकडे एवढा निधी नव्हता. पण ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे कंपनीला मॅग्नेट योजनेची माहिती मिळाली. राजीव यांनी मॅग्नेटच्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मॅग्नेट योजनेतून प्रकल्प उभारण्याचे ठरवले. धावपळ करत त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. हजारो अर्जातून त्यांच्या प्रकल्पाची अनुदानासाठी निवड झाली. प्रक्रिया प्रकल्पासाठी ३ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च झाला. या प्रकल्प खर्चापैकी कंपनीने १ कोटी २२ लाख रुपये गुंतवणूक केली. तर १ कोटी ५१ लाख रुपये मॅग्नेटमधून अनुदान मिळाले. उरलेल्या ५० लाख रुपयांचे कर्ज कंपनीने काढले आहे. विशेष म्हणजे आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनीने केवळ १० महिन्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प उभा केला. या प्रकल्पात १०० टन क्षमतेचे पॅकहाउस आहे. प्रति तास दोन टन क्षमतेचे पल्पर, प्रतिबॅच दोन टन क्षमतेचे ब्लास्ट फ्रिझिंग युनिट, उणे २२ अंश सेल्सिअस क्षमतेचे शीतगृह आहे. आवश्यक तेवढ्याच सुविधा निर्मितीवर कंपनीने भर दिला.

प्रक्रियेत भरारी ः
आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी आंबा, जांभूळ, सीताफळ आणि पेरू पल्प निर्मिती आणि फ्रोझन स्वीट काॅर्न निर्मितीचे काम करते. यापैकी आंबा आणि जांभळाचे उत्पादन बुलडाणा जिल्ह्यात कमी होते. प्रक्रियेसाठी लागणारा आंबा बाहेरून मागवला जातो. हापूस, केसर आणि तोतापुरी आंब्यावर प्रक्रिया केली जाते. केसर आंब्याची मराठवाड्यातून खरेदी केली जाते. हापूस आंबा कोकणातून येतो. तर तोतापुरी आंबा आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून खरेदी केला जातो. कोणतेही ताजे फळ हंगामातच मिळते आणि भावही कमी असतात. त्यामुळे त्या त्या हंगामात खरेदी करून त्याचा पल्प काढून शीतगृहात साठवला जातो. कंपनीने यंदा ९० टन हापूस आंबा पल्प निर्मिती केली आहे. तर १०० टन तोतापुरी आंब्यावर प्रक्रिया केली. तसेच ३० टन आंबा स्लाइस निर्मिती केली आहे. कंपनीचा आंबा पल्प विदेशातही जातो. झेन नॅचरल ॲग्रो या कंपनीसाठी तोतापुरी आंबा पल्प निर्यातीसाठी दिला आहे. असेच इतरही कंपन्यांसोबत आभाळमाया काम करत आहे. यासोबतच कंपनी आपको (AAPCO) ब्रॅंडखाली आंबा ज्यूस सेंटर्स, हाॅटेल-रेस्टाॅरंट्स आणि केटरिंगमध्येही जातो. जांभळाचा पल्पही मोठ्या प्रमाणात काढला जातो. जांभळाची खरेदी कंपनी गडचिरोली जिल्ह्यातून करते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी जंगलातून जांभूळ गोळा करून आणतात. स्थानिक व्यापाऱ्यांमार्फत कंपनी खरेदी करते. पुढील काळात थेट आदिवासी संस्थांकडून खरेदी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. थेट खरेदीमुळे आदिवासी बांधवांना दोन पैसे जास्त देता येईल आणि अम्यालाही स्वस्त जांभूळ मिळेल, असे राजीव यांनी सांगितले. आभाळमाया कंपनीने चालू वर्षात ३० टन जांभळावर प्रक्रिया केली आहे. कंपनीच्या जांभूळ पल्प ‘जामून शाॅट’साठी विशेष पसंती मिळत आहे. जांभूळ पल्प हा ज्यूस सेंटर्स, हाॅटेल्स-रेस्टाॅरंट्स आणि घरगुती वापरासाठीही जातो. पेरू पल्पची ३० टन निर्मिती केली आहे. पेरूचा पल्प लहान बियांमुळे काढणे तसे जिकरीचे काम आहे. परंतु कंपनी उत्तम दर्जाचा पल्प तयार करून विक्री करत आहेत. ५ टनांपर्यंत सीताफळ पल्प उत्पादन घेतले आहे. पल्प काढण्यासाठी बाळापूर वाण वापरला जातो. सीताफळ पल्पमध्ये बियांवरील पाकळ्या किती आहे त्यानुसार दर मिळतो. जास्त पाकळ्या हव्या असतील तर पूर्ण काम हातानेच करावे लागते. त्यासाठी मनुष्यबळ जास्त लागते. पण त्याला दरही अधिक असतो. कमी पाकळ्या असतील कर दर कमी मिळतो. पेरू आणि सीताफळ पल्पलाही सर्व क्षेत्रातून मागणी असते. कंपनीने फ्रोझन स्वीट काॅर्नची ७० टन निर्मिती कंपनीने केली आहे.
आभाळमाया कंपनीमध्ये पल्प निर्मितीचे काम फळांच्या हंगामाप्रमाणे चालते. मे आणि जून महिन्यात आंब्याचा पल्प काढला जातो. कारण या काळात आंबा उपलब्ध होतो. जून आणि जुलै महिन्यांत जांभळावर प्रक्रिया होते. या काळात जांभळाचे उलब्धता अधिक असते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत सीताफळ आणि पेरूचा पल्प काढला जातो. फळांचा हंगाम ठरलेला आहे. हंगाम संपला की ताजी फळे मिळत नाही. स्वीट कार्नवर ऑगस्ट ते मे या दरम्यान कंपनी प्रक्रिया करते. पल्प आणि स्वीट काॅर्न निर्मिती झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये साठवले जाते. पुढे वर्षभर मागणीनुसार त्याची विक्री केली जाते.

उत्पादने वाढविणार...
राजीव आणि त्यांची टीम सर्व कामे एकाच वेळी न करता अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळाल्यानंतर करण्याचे ठरवले आहे. त्यांची उत्पादने निर्यातक्षम आहेत. निर्यात करणाऱ्या कंपन्यांना ते माल पुरवतात. निर्यातीच्या बाजारात कोणत्या गुणवत्तेची उत्पादने लागतात त्यानुसार सुधारणा करणे हा त्यांचा उद्देश आहे. सर्व अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही बाजारात उतरायचे नाही, असे त्यांनी सुरुवातीलाच ठरवले होते. दुसऱ्या कंपन्यांच्या ब्रॅंडखाली उत्पादन विकल्यानंतर आता आपणही निर्यात करू शकतो याचा आत्मविश्वास आल्याचे राजीव यांनी सांगितले. आभाळमायाची उत्पादनांची गुणवत्ता पाहून अनेक कंपन्या त्यांच्याकडे इतर उत्पादनांचीही मागणी करत आहेत. डाळिंब दाणा आणि ज्यूस खरेदीसाठी विदेशातील कंपन्या तयार आहेत. हिरवी मिरची आणि हिरवी मिरची पेस्ट तसेच लाल मिलची पेस्टसाठी मागणी येत आहे. ‘मिक्स व्हेज’ घेण्यासाठी काही कंपन्या तयार आहेत. ही सर्व उत्पादने तयार करण्यासाठी काम करत आहोत, कारण सुरुवातीला त्याचा अभ्यास करावा लागतो, असे राजीव यांनी सांगितले. कच्चा माल मिळावा यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला नवीन पीक असल्याने स्वीट काॅर्न लागवडीसाठी शेतकरी पुढे येत नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतीत लागवड केली. नंतर शेतकऱ्यांनी लागवडी केल्या. मिरची आणि इतर पिकांचेही असेच आम्ही प्रयोग कंपनी करणार आहे, अशी माहिती दिली.
बीजोत्पादनातही आघाडी ः
आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी सभासद शेतकऱ्यांंच्या माध्यामातून विविध बियाणे कंपन्यांसाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवते. त्यासाठी बियाणे कंपन्यांसोबत करार केला जातो. सोयाबीन, तूर, कांदा आणि इतर भाजीपाला बियाणे उत्पादन घेतले जाते. बियाणे कंपन्यांसाठी शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन घेतले जाते. बियाणे कंपन्या देत असलेले सर्व साहित्य शेतकऱ्यांना दिले जाते. गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मितीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाते. शेतकऱ्यांनी बीजोत्पादन घेतल्यानंतर त्यावर शेतकरी कंपनी प्रक्रिया करते. त्यामुळे कंपनीलाही उत्पन्न मिळते. बीजोत्पादनातून शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे, असे आभाळमाया कंपनीच्या सदस्यांनी सांगितले.

------------
इन्फो ः
‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ दृष्टिकोन
जांभूळ, पेरू, सीताफळ, आंबा या फळांसह मक्यावर प्रक्रिया करताना अनेक प्रकारचे ‘वेस्ट’ अर्थात उपयोगात न येणारा माल मिळतो. उदा. सीताफळावर प्रक्रिया करताना वरची साल आणि बिया मिळतात. आभाळमाया कंपनी या सालींचा वापर सौंदर्य प्रसादने निर्मितीसाठी कसा होईल? त्याची काय उत्पादने तयार करता येईल? यावर काम करत आहे. तसेच सीताफळाच्या बियांच्या पावडरचा धान्यात होणारी कीड नियंत्रणासाठी उपयोग होऊ शकतो. रासायनिक पावडरीपेक्षा सीताळफाच्या बियांची पावडर आरोग्यासाठीही चांगली आहे, असे सांगत कंपनी पुढील काळात या उत्पादनांमध्ये उतरणार असल्याचे राजीव यांनी म्हटले आहे. पेरूचा पल्प काढल्यानंतर बिया शिल्लक राहतात. त्या बियाण्यांपासून नैसर्गिक स्क्रब निर्मितीसाठी कंपनी संशोधन करत आहे.
स्वीट काॅर्नवर प्रक्रिया करताना कणसावरील पानांचे कवच काढले जाते. या पानांपासून नैसर्गिक पिशव्या निर्मिती करण्याचा विचार कंपनी करत आहे. तसेच मका दाणे काढल्यानंतर कणसाचा जो भाग शिल्लक राहतो त्यापासूनही प्लेट्स, गिफ्ट बाॅक्स बनवण्यावर विचार सुरु आहे. सध्या बाजारात प्लॅस्टिक प्लेट्स उपलब्ध आहेत. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पण नैसर्गिक प्लेट्स आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मक्याच्या कणसामध्ये जे धागे म्हणजेच सिल्क असते, त्यापासून आरोग्यवर्धक ग्रीन टी बनविणार आहे. जपान आणि रशियात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याला मोठी मागणी असल्याचेही राजीव यांनी सांगितले. जांभूळ बियांपासून मधुमेह रुग्णांसाठी उपयोगी जांभूळ पावडर बनवण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर तयार होण्याऱ्या प्रत्येक ‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ निर्मितीचा ध्यास राजीव आणि त्यांच्या टीमने घेतला आहे.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com