esakal | शैक्षणिक शुल्क हप्त्याने भरण्याच्या मागणीसाठी ‘अभाविप’चे स. प. महाविद्यालयात आंदोलन |Pune
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक शुल्क हप्त्याने भरण्याच्या मागणीसाठी ‘अभाविप’चे स. प. महाविद्यालयात आंदोलन

शैक्षणिक शुल्क हप्त्याने भरण्याच्या मागणीसाठी ‘अभाविप’चे स. प. महाविद्यालयात आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे अनेकांच्या आर्थिक स्थितीवर दूरगामी परिणाम झाला आहे. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे विद्यार्थी आणि पालक एकाच वेळी संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी असमर्थ आहेत. त्यामुळे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पुणे महानगर) वतीने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले.

महाविद्यालयाकडून टप्प्या-टप्प्याने शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत निदर्शने केली. तसेच क्रीडा कोट्यातील राखीव जागांवर देखील महाविद्यालयाने अतिरिक्त शुल्क भरून प्रवेश दिले आहेत, त्याचाही निषेध आंदोलनात नोंदविण्यात आला. याबाबत महाविद्यालयाला वारंवार निवेदन देण्यात आली आहेत, परंतु त्यावर महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. येत्या दोन दिवसांत या समस्येवर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला आहे.

‘‘संपूर्ण शैक्षणिक शुल्क एकाच वेळी घ्यायचे, याबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने गेल्यावर्षी हप्त्याने शुल्क भरण्याची मुभा दिली होती. परंतु दरम्यान केवळ शैक्षणिक शुल्कावर आधारित असणारे विनाअनुदानित अभ्यासक्रम राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर परिषदेने हा निर्णय घेतला आहे. परंतु तरी देखील विद्यार्थ्यांच्या मागणीवर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल.’’

- डॉ. सविता दातार, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

loading image
go to top