वाहत्या पाण्याला बांधणार कोण?

वाहत्या पाण्याला बांधणार कोण?

पुण्याच्या चाळीस वर्षांहून अधिक वास्तव्यात दोनदा भीषण स्वरूप अनुभवायला मिळाले. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला आणि त्याआधी ४ ऑक्‍टोबर २०१० रोजी. या दोन्ही वेळेस पुण्यात भयंकर पूर आले. त्याला कारणीभूत ठरला होता, शहरात दोन-चार तास पडलेला मोठा पाऊस. अचानक काही तास पाऊस पडतो आणि मग सारे चित्रच पालटून जाते. हे इतके अचानक घडते की या परिस्थितीला योग्य प्रतिक्रियाही देता येत नाही. पण हे दरवर्षी घडत असूनही त्याला सामोरे जाण्याची तयारी करत नाही, हेही वास्तव आहे.

नगरे वाढत असताना, पहिला बळी जातो त्या भागातील नैसर्गिक प्रवाहांचा. ओढे, नाले, ओहोळांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. यात आता अनेक गोष्टींची भर पडली आहे. शहरीकरण वाढले तशी मोकळी जमीन कमी होत गेली, तिच्यावर डांबराचे, सिमेंटचे, पेवर ब्लॉक्‍स असे काही ना काही आवरण आले. त्यामुळे पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. पावसाचे जवळजवळ सर्वच पाणी वाहू लागले. खुद्द पुण्याचे रस्ते फिरून पाहा, बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था शोधूनही सापडणार नाही. त्यात भर पडते ती पदपथ, रस्ते दुभाजक आणि गतिरोधकांची. त्यांच्यामुळे पाणी तुंबून राहण्यास आणि रस्त्यांवरील पाण्याची पातळी वाढण्यात भर पडते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाहणाऱ्या पाण्यासाठी यंत्रणा?
शहरांची रचना करताना पावसाचे वाहणारे पाणी हा मुद्दा खिसगणतीतच नसतो. वाहणाऱ्या पाण्याच्या अभ्यासासाठी हायड्रॉलॉजी (जलवहनशास्त्र) ही स्वतंत्र शाखा आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत येणारे पूर किंवा कृष्णेसारख्या नद्यांना येणारे पूर याच्या नियोजनासाठी सक्षम अशा हायड्रॉलॉजिस्टची आवश्‍यकता असते. मात्र, किती नगरांचे नियोजन करताना याची दखल घेतली जाते? निदान वस्ती वसवताना, त्याच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करताना शहराच्या कंटूर नकाशांचा आधार घेतला जातो का? किंवा असे नकाशे अस्तित्वात तरी आहेत का? याबाबत लहान - मोठी शहरे सोडाच, पण २६ जुलै २००५ चा महाप्रलय येईपर्यंत मुंबईसारख्या महानगराला कंटूर नकाशे म्हणजे काय, याची कल्पना नव्हती. त्या पुराची चिकित्सा करणाऱ्या चितळे समितीने शिफारस केल्यानंतर मग तिकडे लक्ष गेले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरांची भूरचना
पुण्याच्या भूरचनेबद्दल ढोबळमानाने सांगायचे, तर बाजूने उंच भाग (टेकड्या) आणि मधून वाहणारे प्रवाह (नदी) अशी ही रचना. त्यामुळे डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी मध्ये वाट काढून नदीपर्यंत पोहोचते. त्यानंतर नदीवाटे पुढे वाहून जाते. डोंगर आणि नदी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आणि रस्त्यांचे जाळे आहे. मोठा पाऊस पडत असताना, हे जाळे ओलांडून पाणी नदीपर्यंत जाते. त्याला व्यवस्थित वाट करून दिली असेल तर ठीक, नाहीतर ते विध्वंस घडवते. या नियोजनात पुण्यासह महाराष्ट्रातील शहरे अयशस्वी ठरली आहेत,  दिवसेंदिवस खालावतच आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ढगफुटी होणार, प्रमाण वाढणार
या समस्येची तीव्रता वाढत आहे ती पावसाच्या बदलत्या पद्धतीमुळे. हंगामातील पावसाचे प्रमाण तेवढेच राहिले आहे, पण कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. जागतिक तापमानात वाढ होत असल्याचा हा परिणाम आणखी व्यापक होत जाईल. त्याचा अनुभव अलीकडच्या काळात आपण घेतच आहेत. त्यामुळे ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. परिणामी, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आपली जबाबदारी आणखी वाढते. अर्थात, आताच्या परिस्थितीत हे मोठे आव्हान आहे, पण त्याला सामोरे जाण्याशिवाय आणि यश मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्यापाशी शिल्लक नाही.. नाहीतर २५ सप्टेंबर २०१९ पेक्षा कितीतरी जास्त आघात सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com