
पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने त्यांना गैरहजेरी दाखविण्यात आले आहे. १३ हजार पैकी तब्बल ९ हजार तक्रारी याच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात नापास होण्याची भीती सतावत असताना विद्यापीठाने वस्तुस्थिती तपासून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘खऱ्या’ तक्रारी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सुरवातीच्या टप्प्यामध्ये कमी विद्यार्थी असल्याने त्यांना जास्त तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. १६ एप्रिलपासून रोज १०० पेक्षा जास्त विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधून परीक्षेसाठी लॉगइन होत नाही, अशा तक्रारी केल्या होत्या. मात्र, या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा न दिल्याने त्यांची अनुपस्थिती लागलेली आहे. त्यामुळे सध्या तरी हे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, अशीच स्थिती आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात या तक्रारी आल्याने परीक्षा विभागाने १६ ते २० एप्रिल दरम्यान परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत त्यांच्या अडचणी नोंदविण्याची मुदत दिलेली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण १३ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यापैकी चार हजार तक्रारी सोडविलेल्या प्रश्नांपैकी कमी प्रश्न सबमिट झाले आहेत, उत्तर सेव्ह झाले नाही, कमी गुण पडले अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. नऊ हजार तक्रारी या लॉगइन न झाल्यामुळे परीक्षा देता आली नसल्याच्या आहेत. या तक्रारीची व्यवस्थित पडताळणी केली जात आहे.
परीक्षेचा कालावधी - ४५ दिवस
अपेक्षित विद्यार्थी - ६.२५ लाख
परीक्षेसाठी विषय - सुमारे ५४००
Web Title: About Nine Thousand Complaints Of Examinees To Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..