वालचंदनगरच्या फळविक्रेत्याचा मुलगा झाला सी.ए
वालचंदनगर, ता. ३ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील फळविक्रेत्याचा मुलगा अबरार आयुब आळंद याने २३ व्या वर्षी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) च्या परीक्षेमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळविले असून आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
वालचंदनगर जवळील कळंब गावच्या हद्दीमध्ये रामवाडी येथे राहणारे आयुब जंगबहादूर आळंद हे वालचंदनगर परीसरातील आठवडे बाजारामध्ये फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. तर आई शबनम गृहिणी आहेत. अबरारचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वालचंदनगरमधील भारत चिल्ड्रेन्स ॲकॅडमी शाळेमध्ये झाले. उच्च शिक्षण पुण्यामध्ये झाले. सुरवातीपासून सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दररोज दहा ते बारा तास अभ्यासाला सुरुवात केले. नोव्हेंबर २०२० मध्ये सीएच्या संदर्भातील फाउंडेशन परीक्षेमध्ये यश मिळविले. मे २०२२ मध्ये इंटर परीक्षा उत्तीर्ण झाला. सन २०२५ मध्ये सी.ए फायनल परीक्षेच्या पहिल्या ग्रुपमध्ये यश मिळविले. जानेवारी २०२६ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये यश मिळवून सी.ए. होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले. अबरार याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीए परीक्षेमध्ये यश मिळविल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सी.ए.च्या परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी सी.ए. असलेले चुलत बंधू वसीम आळंद व पोलिस उपनिरीक्षक आजम आळंद यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा अबरारला फायदा झाला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार....
नियमित अभ्यास करून योग्य पद्धतीने मेहनत व कष्ट केले तर यश निश्चित मिळत असते. आयुष्यामध्ये कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने कठोर परिश्रम करणे गरजेचे असून येणाऱ्या काळामध्ये सीए व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे अबरार आळंद यांनी सांगितले.

