Accident news : किरकटवाडी फाट्याजवळ डंपरच्या धडकेनंतर टॅंकर खाली चिरडून तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू

डंपर व टॅंकर घेऊन दोन्हीही चालक पसार
Accident
Accidentsakal

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ रामेश्वर पतसंस्थेच्या समोर भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरुन येणाऱ्या टॅंकरखाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शिवाणी शैलेश पाटील (वय 24, रा. स्वप्नपूर्ती हाइट्स, किरकटवाडी ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

शिवाणी पाटील या आपल्या पतीसह दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर शिवाणी पाटील पतीसह रस्त्यावर पडल्या.

त्याच वेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टॅंकरचे चाक शिवाणी पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर व टॅंकर ही दोन्हीही वाहने घेऊन संबंधित चालक पसार झाले आहेत. पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

डंपर आणि टॅंकरची रोजचीच घाई नागरिकांच्या जीवावर नांदोशी येथील दगड खाणींतून अवजड वाहतूक करणारे डंपर नियम डावलून भरधाव वेगाने किरकटवाडी व मुख्य सिंहगड रस्त्यावरुन ये-जा करत असतात. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही.

दुसऱ्या बाजूला सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. एकेक सोसायटी पाण्यासाठी दरमहा लाखो रुपये मोजत आहे आणि त्यामुळे टॅंकर चालकही रस्त्यावरील इतरांची पर्वा न करता भरधाव वेगाने 'टार्गेट' पूर्ण करण्यासाठी टॅंकर पळवत आहेत. डंपर आणि टॅंकरची ही रोजचीच स्पर्धा अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

असा झाला अपघात सीसीटीव्ही कॅमेरऱ्यातील दृश्यांनुसार नांदेड फाट्याकडून एक दुचाकी जयप्रकाश नारायण नगरकडे वळण्यासाठी विरूद्ध बाजूने आल्याने डंपर चालकाने अचानक डंपार उजवीकडे घेतला. त्याच वेळी ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीला डंपरचा जोरात धक्का लागला व दुचाकीवरील व्यक्ती खाली पडल्या. समोरुन येत असलेल्या टॅंकरचे चाक महिलेच्या थेट डोक्यावरून गेल्याने महिलेचा यात जागीच मृत्यू झाला.

"डंपर व टॅंकर या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. अपघाताचा व्हिडिओ मिळाला असून लवकरच दोन्ही वाहने व चालक सापडतील. दुर्दैवाने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे." सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com