हडपसर-सासवड पालखी महामार्गावर अपघातसत्र सुरूच | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर-सासवड पालखी महामार्गावर अपघातसत्र सुरूच

हडपसर-सासवड पालखी महामार्गावर अपघातसत्र सुरूच

उंड्री : पुणे-सासवड महामार्गाचे पालखी मार्ग नामकरण केले. मात्र, दिवेघाट ते हडपसर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. भेकराईनगर आज (गुरुवार, दि. १९) मध्यरात्री दुभाजकाला धडकून अपघात होऊन ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. पुणे-सासवड महामार्गावर आणखी किती बळी गेल्यावर शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सासवड रस्त्याचे दिवेघाटाचे काम रुंदीकरण रखडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुण्याहून सासवड, जेजुरी, लोणंद, नीरा, फलटण, बारामती, पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावरील फुरसुंगीतील उड्डाण पुल अरुंद असल्याने सतत वाहनतूककोंडी होऊन अपघातसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. कात्रज-मंतरवाडी बायबास मार्गे मुंबईहून येणारी वाहनेही या रस्त्याने सासवड आणि सोलापूर रस्त्याकडे ये-जा करतात. दुभाजकाला रेडियम रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी पालिका आणि वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, त्याला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्यामुळे सामान्यांचे निष्पाप बळी जात असल्याची तक्रार अशोक खोपडे यांनी केली आहे.

रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अपघात होऊ नये, म्हणून शाळकरी मुले, कष्टकरी-कामगार, व्यावसायिक सुरक्षित घरी यावेत यांचे कुटुंबीय देवाकडे प्रार्थना करीत आहेत. अशी भयावह अवस्था झाली असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना घाम का फुटत नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक सचिन कदम यांनी उपस्थित केला आहे.

रस्ता कमी खड्डे जास्त अशी अवस्था झाल्यामुळे अपघातामध्ये गोरगरीब, कष्टकरी, कामगार, महिला, वृद्ध, शाळकरी मुले या निष्पापांचे बळी जात आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या कामाकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे सोमनाथ यादव यांनी सांगितले.

फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुल अरुंद असल्याने वाहतूककोंडी होत असून, या रस्त्यावर विद्युत दिवे नाहीत. हडपसर-सासवड रस्ता नाही, तर खड्ड्यांचा बाजार झाला आहे. याच रस्त्यावर होलसेल कपड्यांची मोठी दुकाने आहेत. या परिसरात मोठी गोडाऊन असल्याने अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. मुंबई, कोल्हापूरकडे जाणारी आणि येणारी वाहने मंतरवाडी चौकातून सोलापूर आणि सासवडकडे जातात. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे.

loading image
go to top