परदेशी विद्यार्थ्यांचा हिशेबच केंद्र सरकारकडे नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

देशातील कोणत्या शहरात किती परदेशी विद्यार्थी शिकत आहेत, कोणत्या शैक्षणिक संस्थेत, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, याचा हिशेबच केंद्र सरकारकडे नाही. आता माहिती ठेवण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून माहिती संकलित केली जात आहे.

पुणे - देशातील कोणत्या शहरात किती परदेशी विद्यार्थी शिकत आहेत, कोणत्या शैक्षणिक संस्थेत, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, याचा हिशेबच केंद्र सरकारकडे नाही. आता माहिती ठेवण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून माहिती संकलित केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशामध्ये सध्या सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी पुणे, बेंगलोर, हैदराबाद या तीन शहरांमध्ये आहेत. नेपाळ, अफगाणिस्तान, आफ्रिका, सुदान, नायजेरिया या देशांतून सर्वाधिक विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येतात. परदेशी विद्यार्थांना शिक्षण देण्यात भारत जगात २६ व्या क्रमांकावर आहे. 

सुमारे साडेसात लाख भारतीय विद्यार्थी इतर देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. परदेशी विद्यार्थी भारतात आल्यानंतर त्यांची नोंद गृह मंत्रालयाकडे होते. शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ती माहिती विद्यापीठ अनुदान आयोगा(यूजीसी)सह इतर संस्थांकडे जाते. अनेकदा अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थी स्टुडंट व्हिसाऐवजी टुरिस्ट व्हिसावर भारतात येतात. त्याची नोंद संस्थांकडे नसते. त्यामुळे यूजीसी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, गृह मंत्रालय यांच्याकडील आकडेवारी भिन्न असते. त्यामुळे अनेकदा शिक्षण पूर्ण झालेले असताना परदेशी विद्यार्थी भारतात राहताना सापडतात. त्यांना डिपोर्ट करण्याची कारवाई पोलिसांना करावी लागते. 

याबाबत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या उपमहासंचालक नम्रता कुमार पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘‘देशात नेमके किती परदेशी विद्यार्थी आहेत, याची माहिती ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. वैद्यकीय अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाला किती विद्यार्थी शिकत आहेत, याची एकत्रित नोंद होत नाही. ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी माहिती मागविली जात आहे.’’ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पण त्यांची कारणे शोधून त्यांच्या अडचणी सोडविणे, आपल्या संस्कृतीशी जोडून घेणे आदी प्रयत्न करावे लागतील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accountability of foreign students is not with the Central Government