esakal | आरोपीने अटक टाळण्यासाठी स्वतःच्या अंगावरच केले ब्लेडने वार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आरोपीने अटक टाळण्यासाठी स्वतःच्या अंगावरच केले ब्लेडने वार

sakal_logo
By
प्रशांत पाटील

उरुळी कांचन - लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सत्तरहून अधिक जबरी घरफोडीचे गुन्हे नावावर असणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना (Criminal) लोणी काळभोर पोलिसांनी (Police) सोमवारी (ता.२४) अटक (Arrested) केली आहे. जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८, बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर), सोमनाथ नामदेव घारूळे (वय २६, रा. उरुळी देवाची ता. हवेली ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिघांनी सहा घरफोड्यांची माहिती दिली आहे. (Accused Stabbed Blade Himself in the Body to Avoid Arrest)

दरम्यान, यातील आरोपी बल्लुसिंग टाक याने पोलिसांची अटक टाळण्यासाठी ब्लेडच्या साह्याने स्वतःच्या अंगावर वार करून घेतले होते. मात्र पोलिसांनी जखमी अवस्थेमधील बल्लुसिंग टाक व त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर आठ दिवसांपूर्वी वडकी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना बल्लुसिंग टाक हा मोटारसायकलवरुन डोंगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे राजू महानोर, पोलिस कर्मचारी अमित साळुंके, बाजीराव वीर, निखिल पवार यांनी बल्लुसिंग टाक याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. पोलिस जवळ पोचताच, टाक याने स्वतःजवळीस ब्लेडच्या साह्याने अंगावर ठिकठिकाणी अंगावर वार करून घेतले. यावर पोलिसांनी टाक यास यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता टाकच्या अंगावर नव्वदहुन अधिक वार असल्याचे आढळून आले.

हेही वाचा: GTPMS मुळे पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार सोपी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी बल्लुसिंग टाक याच्या सहकाऱ्यांची माहिती घेतली. बल्लुसिंग टाक याच्यासह जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे हे तिघेजण सॅन्ट्रो कारमधून हडपसर- सासवड मार्गावर प्रवाशांना लुटत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उरुळी देवाची हद्दीत सापळा रचून जयसिंग जुनी व सोमनाथ घारूळे या दोघांना सोमवारी (ता. २४) रात्री अटक केली.

साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तिघांकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक एलईडी टिव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार आणि एक मोटार सायकल असा एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली आहे.