पद रिक्त

पद रिक्त
Published on

अचलपूर कृषी कार्यालयातील १८ पदे रिक्त

मनुष्यबळाची कमतरता; एका कर्मचाऱ्यांवर १०-१२ गावांची जबाबदारी

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : अचलपूर तालुका कृषी कार्यालयातील मंजूर ४६ पदांपैकी तब्बल १८ पदे रिक्त असल्याने उर्वरित २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे. तालुक्यातील ४३ हजार २६६ शेतकरी आणि १२७ गावांसाठी विविध शासकीय योजना, पीक पंचनामे, निविष्ठा वाटप तसेच शेतीविषयक मार्गदर्शनाची जबाबदारी असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
अचलपूर तालुका कृषी विभागाचे भौगोलिक क्षेत्र ६४ हजार ३६ हेक्टर असून, लागवडीखालील क्षेत्र ५३ हजार ७७७ हेक्टर आहे. यामध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार ६३६ हेक्टर, तर रब्बीचे ९ हजार ३२४ हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रासह १२७ गावांतील ४३ हजार २६६ शेतकऱ्यांशी संबंधित कामकाज या कार्यालयामार्फत केले जाते. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोफत बियाणे वाटप, माती परीक्षण, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो महासन्मान योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड यांसह विविध योजनांची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. त्यामुळे कार्यालयात शेतकऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि कार्यालयीन सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येते.

दोन उपकृषी अधिकाऱ्यांवर कारभार
अचलपूर कार्यालयात पाच उपकृषी अधिकारी पदे मंजूर असून चार पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी एक अधिकारी अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहे, तर अन्य एका अधिकाऱ्याकडे गुणनियंत्रण अधिकाऱ्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दोनच उपकृषी अधिकाऱ्यांवर तालुक्याचा कारभार सुरू आहे. सहायक कृषी अधिकाऱ्यांचीही सहा पदे रिक्त असल्याने काही कार्यरत कर्मचाऱ्यांकडे तब्बल १० ते १२ गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिणामी, क्षेत्रीय कामकाजाचा ताण वाढला असून योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

४६ मंजूर पदांपैकी १८ रिक्त
पद--मंजूर--कार्यरत--रिक्त
तालुका कृषी अधिकारी-- १--१-- ०
मंडळ कृषी अधिकारी--३--१-- २
उपकृषी अधिकारी-- ५--४--१
सहायक कृषी अधिकारी-- २५-- १९-- ६
सहायक अधीक्षक--१--१--०
वरिष्ठ लिपिक-- १-- १-- ०
अनुलेखक--४--०-- ४
वाहनचालक-- १--०-- १
शिपाई--४-- ०-- ४
चौकीदार- १-- ०--१
एकूण--४६-२८--१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com