पुणे : सद्यस्थितीला विषमता, जीवनशैली व विकासनीती कारणीभूत : अच्युत गोडबोले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

- वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्काराचे शि.द. फडणीसांच्या हस्ते वितरण.

वारजे माळवाडी : सध्या अंधार, नैराश्य खूप आहे. समाजात मोठ्या प्रमाणावर विषमता वाढलेली आहे. बेकारी, प्रदूषण ही राक्षसे आपण निर्माण केली आहेत. विद्यार्थी, शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याला स्वीकारलेली जीवनशैली आणि चुकीच्या दिशेने जाणारी आपली विकासनीती कारणीभूत असल्याचे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी गोडबोले बोलत होते. गोडबोले यांना साहित्य क्षेत्रासाठीचा, तर खासदार डॉ. कोल्हे यांना कला क्षेत्रासाठीचा हा पुरस्कार देण्यात आला. 

मायवतींच्या एका निर्णयाने काँग्रेसची पंचाईत; सरकार धोक्यात

स्व.रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कराचे स्वरुप रोख अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे आहे. डॉ. कोल्हे यांच्यावतीने त्यांचे मोठे बंधू सागर कोल्हे यांनी पुरस्कार स्वीकारला. उद्योजक कृष्णकुमार गोयल, गरवारे सोशल ट्रस्टचर डाॅ.राज पाठक, सागर कोल्हे, अनील डेअड्राय आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

गोडबोले म्हणाले, 'तांत्रिक विषयावर माझी इंग्रजी विषयातील चार पुस्तके आहेत. ती चिनी भाषेत भाषांतरित झाली आहेत. पण मराठीत विविध विषयाची सुमारे 33 पुस्तके लिहिली आहेत. पण मी स्वतःला विद्यार्थी मानतो. विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते. ते मी आजपर्यंत जिवंत ठेवले आहे. शिक्षकांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमधील विद्यार्थीपण हरवलेले दिसते. प्राणी आणि मानव या दोघात कुतूहल या एकमेव गुणामुळेच फरक करता येतो. सध्याची शैक्षणिक व्यवस्था परीक्षा आणि गुण या चक्रव्यूहामध्येच अडकली आहे. विद्यार्थ्यांमधील कुतूहल मांडण्यास संधी मिळत नाही.'

फडणीस म्हणाले, "गोडबोले यांनी संगणक, आदिवासी, झोपडपट्टीवासीयांचे जीवन, अर्थशास्त्र, ज्ञानोटेक्नॉलॉजी या विषयांवर लिखाण केले, असे विलक्षण व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभल्याची दाद त्यांनी दिली. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची उत्कृष्ट भूमिका केली आणि ते घराघरात पोचले. प्रत्यक्षात त्यांची भूमिका आता वेगळी असून, आता खासदार म्हणून जनकल्याणाचे काम सुरू आहे." 

दिलीप बराटे म्हणाले, 'साहित्य, कलेत उत्तुंग काम केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देतो. यापूर्वी संदीप खरे, अशोक नायगावकर, नागराज मंजुळे अशा अनेक नामवंतांना दिला आहे. साहित्य संमेलनाची सुरवात छोट्याशी होती. नवोदित कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हे संमेलन 19 वर्षे झाले सातत्याने सुरू आहे. मराठी भाषा जोपासली पाहिजे. यासाठी संमेलन आयोजित करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Achyut Godbole talked about Social Issue