दीपक मारटकर खून प्रकरणातील आरोपींवर मोक्कानुसार कारवाई

सनिल गाडेकर
Wednesday, 21 October 2020

बुधवार पेठेतील गवळी आळीमध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी धारदार शस्त्राने वार करीत दीपक मारटकर यांचा खून केला.

पुणे : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील वर्चस्ववादातून गुंड बापू नायर आणि स्वप्नील ऊर्फ सतीश मोडवे टोळीतील सदस्यांकडून संघटितरीत्या मारटकर यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आले आहे.

अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र मदनलाल सराफ, निरंजन सागर म्हंकाळे, प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश कोलते, राहुल श्रीनिवास रागीर, रोहित ऊर्फ बाळा कमलाकर कांबळे, रोहित दत्तात्रेय क्षीरसागर, संदीप ऊर्फ मुंगळ्‌या प्रकाश कोलते, लखन मनोहर ढावरे, चंद्रशेखर रामदास वाघेल यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवार पेठेतील गवळी आळीमध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी धारदार शस्त्राने वार करीत दीपक मारटकर यांचा खून केला. याप्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी वरिष्ठ अधिका-यांकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता. अपर पोलिस आयुक्त दक्षिण विभाग डॉ. संजय शिंदे यांनी अटक आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा 1999 नुसार विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींनी केले सातत्याने गंभीर गुन्हे :
टोळीचे वर्चस्व निर्माण करून खून करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे आरोपींनी सातत्याने केले आहेत. सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. मोक्का कायद्यानुसार करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.

 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against accused in Deepak Maratkar murder case