Pune : बोरीभडक येथील लॉजवर वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

Pune : बोरीभडक येथील लॉजवर वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई

राहू : बोरीभडक (ता.दौंड) येथील पुणे सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या नक्षत्र लॉजवर उजळ माथ्याने सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाने छापा टाकून धडक कारवाई केली. वेश्या व्यवसाय करणा-या चार तरुणींची सुटका केली. लॉजचे मालक व व्यवस्थापक असे एकूण सहा आरोपींवर पिटा कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभाग (ए.एच.टी.यु.) चे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी ए.एच.टी.यु. विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांचे पथक नेमून त्यांना अवैध वेश्याव्यवसाय धंदयाची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

सदर पथकाने १२ ऑक्टोबर रोजी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे-सोलापूर रोड, कासुर्डी टोलनाका येथे येवून गोपनीय माहिती काढत असताना त्यांना उरुळीकांचन खेडेकरमळा नजीक बोरीभडक, ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत पुणे-सोलापूर रोड लगतचे नक्षत्र लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे खात्री करणेसाठी पोलीस पथकाने नक्षत्र लॉज या ठिकाणी बनावट गि-हाईक पाठविले.

तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून सायंकाळी अचानकपणे छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणारे दोघे १) किर्तिश सुधाकर हेगडे (शेट्टी) वय ३६ वर्षे रा.बोरीभडक, चंदनवाडी ता.दौंड जि.पुणे.मुळ राहणार मिनगुंडी कंपाउंड, उडपी, कर्नाटक २) रुपेश किसन झुनगारे वय ३३ वर्षे रा.सांगवी ता.भोर जि.पुणे तसेच चार पिडीत तरुणी मिळून आलेल्या आहेत.

किर्तिश हेगडे (शेट्टी) व रुपेश झुनगारे यांना अटक करण्यात आलेली असून लॉजचा मालक किशोर ज्ञानेश्वर आतकिरे रा.बोरीभडक (ता.दौंड) व त्यांचे आणखीन तीन साथीदार असे संगनमताने पिडीत तरुणींना पैशाचे अमिष दाखवून नक्षत्र लॉज येथे त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस पथकाने सांगितले. सहा आरोपींचे विरुध्द यवत पोलीस स्टेशनला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा व भारतीय दंड विधान कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयात लॉजवर मिळून आलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून फरारी आरोपी यांचा शोध चालू आहे. लॉजवर मिळून आलेल्या ४ पिडीत तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेली आहे. सदर वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता असून त्यामध्ये आणखीन यामध्ये आणखीन कोणा कोणाचा सहभाग आहे या संदर्भात अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

यातील आरोपी लॉज मालक किशोर आतकिरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत पोलीस स्टेशनला दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात तो सध्या जामीनावर सुटलेला आहे. असे पोलिसांनी सांगितले

सदरची कारवाई ही पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांचे पथकाने केली आहे.