सहा रेशन दुकानांना ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

शहरातील काही रेशन दुकानांमध्ये उंदरांचा सुळसुळाट, ओल्या भिंती आणि अस्वच्छता आढळून आल्याने नऊ दुकानचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तर, अन्नधान्य वितरणात तफावत आढळल्यामुळे सहा दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. 

पुणे - शहरातील काही रेशन दुकानांमध्ये उंदरांचा सुळसुळाट, ओल्या भिंती आणि अस्वच्छता आढळून आल्याने नऊ दुकानचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तर, अन्नधान्य वितरणात तफावत आढळल्यामुळे सहा दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात धान्य वितरणात तफावत आढळल्यामुळे सहा दुकानांचे परवाने नुकतेच निलंबित केले आहेत. शहर अन्नधान्य वितरण विभागाने नुकतीच ही कारवाई केली. त्यावर संबंधित रेशन दुकानदारांनी विभागीय आयुक्‍तांकडे अपील केले आहे. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यास अडचण होऊ नये, यासाठी ती दुकाने नजीकच्या रेशन दुकानांना जोडण्यात आली आहेत. 

अन्नधान्य वितरण विभागाकडून शहरातील रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात काही दुकानांमध्ये अस्वच्छतेच्या ठिकाणी धान्याची पोती ठेवण्यात आली होती. एक दुकान बंद होते, तर काही दुकानांमध्ये धान्यविक्रीत तफावत आढळून आली. यासंदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, ""रेशन दुकानांची नियमित तपासणी केली जाते. त्यात नऊ दुकानांमध्ये हा प्रकार आढळून आला. त्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यात योग्य स्पष्टीकरण नसल्यास संबंधित रेशन दुकानांवर कारवाई केली जाईल.'' 

काळाबाजार रोखला 
शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशिनवर नोंद करूनच धान्य वितरित करण्यात येते. त्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड क्रमांक जोडण्यात आला आहे. धान्यविक्रीत पारदर्शकता आल्यामुळे काळाबाजार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

bकाहींना रेशन दुकान चालवणे परवडत नाही. दुकानांचे भाडे जास्त आहे. स्वत:चे दुकान असूनही मार्जिन मिळत नाही. विशेषत- पेठांमध्ये बॅंका किंवा आस्थापनाला जादा भाडे मिळते. त्यामुळे आठ ते दहा दुकानचालकांनी रेशन दुकान बंद करण्यासाठी अन्नधान्य वितरण विभागाकडे अर्ज केले आहेत. 

...म्हणून दुकानांचा आकडा घटला 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 2016 पूर्वी एक हजार 276 रेशन दुकानांचे परवाने देण्यात आले होते. परंतु, ई-पॉस मशिनमुळे व्यवहारात पारदर्शकता आली. त्यामुळे काही विक्रेत्यांनी आपले दुकान बंद केले. त्यामुळे सध्या 827 रेशन दुकाने सुरू आहेत. काहींनी दुकान बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे रेशन दुकानांचा हा आकडा घटून 805 वर येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action to ration shops in Pune Pimpri-Chinchwad Notices for nine due to uncleanness