esakal | सराफी व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह साथीदाराविरुद्ध 'मोक्का'
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सराफी व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह साथीदाराविरुद्ध 'मोक्का'

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : "मराठे ज्वेलर्स'चे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व धमक्‍या देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी दीप्ती काळे व तिच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रविंदद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांवर "मोक्का'अंतर्गत कारवाई केल्यानंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारे अनेकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या महिलेसह तिच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे.

दिप्ती सरोज काळे व निलेश उमेश शेलार अशी यापुर्वीच अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार फरारी आहे. काळे ही टोळीप्रमुख असून ती मागील दहा वर्षांपासून तिने साथीदारांसह टोळीने कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्याद्वारे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतर आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

सराफी व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्या मार्फत पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर डॉ.शिंदे यांनी या गुन्ह्यात "मोक्का' अंतर्गत कलमांचा समावेश करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, दीप्ति काळे व तिच्या साथीदारांविरुद्ध "मोक्का'अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

असा सुरू होता महिलेकडून सगळ्यांनाच त्रास !

सराफी व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिस अटक करण्यासाठी गेल्यानंतर काळे हिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अटक केली होती. त्यानंतरही तब्येतीचे कारण पुढे करून न्यायलयीन कोठडी घेत ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तिने पोलिसांनी डॉक्‍टरांना सांगून औषधांचा जादा डोस दिला, मारहाण केली, झोपू दिले नाही, उपाशी ठेवले अशी तक्रार न्यायालयाकडे केली होती. याबरोबरच एका पोलिस उपनिरीक्षकापास अधिकाऱ्यावरही आरोप केले होते. यापुर्वी महिलेविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. संबंधीत दाखल गुन्ह्यात तिने थेट न्यायालयाविरुद्धच तक्रारीचा सुर लावलेला होता.

loading image