Vidhan Sabha 2019 : 'कँटोन्मेंट'मधून लढणार माढा, माळशिरसचे कार्यकर्ते 

 मंगेश कोळपकर
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

एका जागेसाठी 85 जणांचे 89 अर्ज; प्रशासन चक्रावले 
Vidhan Sabha 2019 : पुणे : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी तब्बल 85 जणांनी 89 उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता. 4) दाखल केले. त्यातील निम्म्याहून अधिक अर्ज माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचे आहेत.

Vidhan Sabha 2019 :  पुणे : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी तब्बल 85 जणांनी 89 उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता. 4) दाखल केले. त्यातील निम्म्याहून अधिक अर्ज माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचे आहेत.

स्थानिक राजकारणातून हेतूतः हे अर्ज कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भरण्यात आल्याची कुजबूज सुरू झाली आहे. या मतदारसंघात गुरुवारी आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल होते. भाजपचे सुनील कांबळे, काँग्रेसचे रमेश बागवे यांचा त्यात समावेश आहे. मात्र, अखेरच्या दिवशी म्हणजे आज एकदम 78 जणांनी 81 अर्ज दाखल केले. 

एकाच दिवशी एवढे अर्ज आल्यामुळे निवडणूक प्रशासन चक्रावून गेले आहे. दुपारी बारा वाजल्यापासून अचानक अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत गेल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत निवडणूक प्रशासनाचे काम सुरू होते. निम्म्याहून अधिक अर्ज माढा आणि माळशिरसमधून कसे आले, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

याबाबत सुनील कांबळे यांचे बंधू आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांना विचारणा केली असता, "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा भ्रष्टाचार शोधून त्यांना आम्ही तुरुंगात टाकले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक आमच्याबद्दल हेतूतः अफवा पसरवित आहेत. त्यांनीच तेथील लोकांना येथे उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे,'' असा दावा केला. 

रमेश बागवे म्हणाले, "देशात कोणीही कोठूनही अर्ज भरू शकतात. माढा आणि माळशिरसमधील शेतकऱ्यांनी पुण्यात येऊन अर्ज का भरले, हे आम्हाला माहिती नाही. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही.'' कांबळे यांच्या गावाजवळच्या लोकांनी येथे येऊन अर्ज का भरले, हे त्यांनी पाहावे, असेही ते म्हणाले. 

अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. 7) आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत येथे काय घडामोडी घडतात, याबद्दल राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे; तसेच बाहेरच्या अर्जांमुळे या मतदारसंघात विविध अफवांचे पेव फुटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: activists of Madha, Malshiras will fight through Pune Cantonment in Maharashtra Vidhan Sabha 2019