
एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
एकमेकांची गंमत करण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. या दिवशी कलाकारांनी इतरांना फसविले आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देवदत्त नागे -
एप्रिल फूलचा एक प्रसंग अविस्मरणीय आहे. ३१ मार्चच्या रात्री दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘देवा, उद्या सकाळी जव्हार येथे शूटिंग आहे. त्यामुळे लवकर ऊठ आणि तेथे ये. मी त्यांना पुन्हा विचारले, नक्की आहे ना शूट? त्यावेळी ते हो म्हणाले. मग, मी १ एप्रिलला सकाळीच उठून कारमध्ये निघालो. कल्याणच्या पुढे पोचलो तर गिरीश यांचा फोन आला अन् ते म्हणाले आजचे शूट रद्द झाले आहे. विशेष खरोखरच शूट रद्द झाले होते. पण, माझे देवानेच एप्रिल फूल केले होते. आज सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे गांभीर्याने वागायला पाहिजे. कोरोनाबाबत कुणाचेही एप्रिल फूल करू नका.
प्राजक्ता माळी -
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार आणि दिग्दर्शक सेटवर होते. त्यावेळी सर्वांनी माझे एप्रिल फूल केले. एका सीनमध्ये त्यांनी मला चुकीचं ठरवलं. मी आदित्यला म्हणते की, नाश्ता केला आहे. तू इडली खाऊन घे. त्यावेळी दिग्दर्शक आले आणि म्हणाले, तू इडली नाही म्हणत आहे, तू इटली म्हणतेय. मग मी म्हणाले, हो का... सॉरी. त्यानंतर मी जाणीवपूर्वक इडली म्हणाले. पण, त्यानंतर दिग्दर्शक आणि आदित्यही म्हणाला, तू इडली नव्हे इटली म्हणतेय. सर्वजण म्हणू लागले, आज काय झालं तुला... चुकीचं का म्हणतेय. इटली नाही इडली म्हण. मग, काय करावे हेच समजेना. त्यानंतर मी पाचवेळा इडली म्हणाले. तसेच, आदित्य इडली खा... हे वाक्य १० ते १५ वेळा मला म्हणायला सांगितले. काही वेळाने टीममधील काहीजण फुटले आणि माझं एप्रिल फूल केल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पोट धरून हसले.
सोनाली कुलकर्णी -
खरंतर एप्रिल फूल केल्याचं काही आठवत नाहीये. पण, सध्या आपण भयानक परिस्थितीमधून जात आहोत. पण, या दिवशी कोरोना व्हायरस नाहीये, सगळी परिस्थिती नॉर्मल आहे, असं काही घडलंच नाही, जणू एप्रिल फूल आहे, असं होईल तेव्हा खूपच छान वाटेल. पण, सर्वांनी आपली, कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये.
प्राजक्ता गायकवाड -
मी दोन वर्षांपूर्वी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते. त्यावेळी मी सीआर होते. त्याच दरम्यान तास, सबमिशन, परीक्षा या सर्वांची धावपळ सुरू होती. मात्र, कुणालाही माहीत नव्हते की उद्या १ एप्रिल आहे. मग मी सर्वांना सांगितले की उद्या कॉलेज नाहीये अन् सर्वांनी ते मान्य केले. कारण, सीआर म्हणजे मी सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुणीही आले नाही. ज्यावेळी क्लासच्या टीचर आणि सरांचा मेसेज आला, त्यावेळी सर्वांना समजले की आपले एप्रिल फूल केले आहे.
शुभंकर तावडे -
मी सातवीत असताना खासगी क्लासला जात होतो. आम्हा मुलांचा एक ग्रुप होता अन् तो खूपच मस्तीखोर होता. ३१ मार्चला आम्ही क्लासमध्ये इतर स्कूलमधून येणाऱ्या मुलांना स्कूल ड्रेस घालून यायला शिक्षकांनी सांगितले, असे म्हणालो. १ एप्रिलला इतर स्कूलमधून येणाऱ्या सर्व मुलांनी तसेच केले. मात्र, आम्ही रंगीत ड्रेस घालून आलो. टीचर यांनी हे सर्व पाहून, काय चाललंय हे सगळं? असे विचारले, त्यावेळी सर्वजण आमच्याकडे पाहू लागले. मग, आम्ही खूपच हसलो अन् एप्रिल फूल केल्याचं सांगितले. ती किक खूपच छान होती.