
चित्रपटातील अभिनयाला ‘गंमत-जंमत’पासून सुरुवात झाली. अभिनयानंतर आता उपशास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे, असे सांगताना माझ्या कारकिर्दीच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये ‘सेमी क्लासिकल’विषयक कार्यक्रम करायला आवडेल, अशी भावना अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केली.
पुणे - चित्रपटातील अभिनयाला ‘गंमत-जंमत’पासून सुरुवात झाली. अभिनयानंतर आता उपशास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे, असे सांगताना माझ्या कारकिर्दीच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये ‘सेमी क्लासिकल’विषयक कार्यक्रम करायला आवडेल, अशी भावना अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वर्षा उसगावकर यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपट, नाटक, गायक या क्षेत्रातील प्रवासाबद्दल त्यांनी गप्पा मारल्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील यश, प्रवास अन् चुकलेले निर्णय, याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने अनुभव सांगितले. टीव्हीवरील मालिका मिळाल्या; पण तिथे मन रमले नाही. कारण, अभिनयाची ‘पाटी’ टाकणे मला जमले नाही. वेबसीरिजसाठीही ऑफर आल्या; पण त्याचे ‘बोल्ड’ स्वरूप रुचत नाही, म्हणून त्या स्वीकारल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. टीव्ही हे तसे माझ्यासाठी वरदान ठरले आहे. ‘महाभारत’ मालिकेत काम केल्यानंतर मला हिंदी चित्रपट मिळाला होता. नंतर उपग्रह वाहिन्या आल्यानंतर मला कामे मिळाली. काही कामांना नाके मुरडली, काही ऑफर नाकारल्या. पण, टीव्हीमध्ये काम केले असते, तर मराठीवरील शेखर सुमन मी झाले असते. हिंदी चित्रपटांविषयी तसेच झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत शिरकाव केला होता. पण, जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा दिला नाही. माझ्या वाट्याला ‘लाल दुपट्टा मलमल का’ हा हिट चित्रपट आला होता. पण, तारखा जुळत नाहीत म्हणून मी त्या वेळी नाही म्हटले. अनेक हिंदी चित्रपटांना नको म्हटले, याची मला आजही खंत वाटते, असेही त्या म्हणाल्या.
मराठी चित्रपटांची संख्या फार
मराठी चित्रपटांची स्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. पण, चित्रपटांची संख्या खूप झाली आहे. क्वॉलिटीपेक्षा क्वांटिटी अधिक आहे, याचा मराठी चित्रपटांनाच धोका आहे. त्यामुळे वर्षाला पन्नासपेक्षा अधिक मराठी चित्रपट तयार होऊ नयेत. तसेच, जे करणार आहात, ते चांगले करा. चित्रपट महोत्सव डोळ्यांसमोर ठेवून चित्रपट केला, तर तो दर्जेदार होईल, असे मत उसगावकर यांनी व्यक्त केले.
‘सदाबहार वर्षा’ आज
वर्षा उसगावकर यांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘सदाबहार वर्षा’ हा कार्यक्रम उद्या (ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यात वर्षा उसगावकर यांच्यासह भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, तेजा देवकर, गायक सौरभ दप्तरदार, अली हुसेन, योगिता गोडबोले हे सहभागी होणार आहेत.
पुस्तकाचा विचार नाही
माझा पुस्तक लिहिण्याचा विचार नाही. कारण, प्रत्येकाच्या विश्वात डार्क साइड असतात, ती लिहिण्याची आणि पुस्तकरूपाने त्याला पुन्हा सामोरे जाण्याची हिंमत लागते. त्यामुळे आत्मचरित्र लिहिणार नाही. पण, प्रवासातील किश्श्यांचे पुस्तक लिहीन. मला राजकीय पार्श्वभूमी असली, तरी राजकारणात जाण्याचा विचार सध्यातरी नाही. भविष्यात काय होईल, हे मात्र सांगता येणार नाही, असे वर्षा उसगावकर यांनी सांगितले.