कऱ्हाड तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या तक्रारींची मंत्रालयात दखल

कऱ्हाड तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या तक्रारींची मंत्रालयात दखल
Published on: 

अदानी प्रकल्पाची मंत्रालयात दखल

उच्चस्तरीय समितीची शुक्रवारी बैठक; पर्यावरणीय परिणामांचा होणार आढावा

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. १७ : पाटण तालुक्यातील तारळी परिसरात अदानी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या १५०० मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या गंभीर तक्रारींची अखेर मंत्रालय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
डोंकवाडी, केंजळवाडी आणि काळणे येथील ग्रामस्थांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरला दौलतनगर येथे उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत प्रकल्पाचे स्थानिक जलस्रोत, पाणीपातळी, पर्यावरण आणि प्रस्तावित बांधकामांच्या परिणामांबाबत काय निर्णय होतो, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभागाच्या मंत्रालय कार्यालयाने अधिकृत पत्र काढले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात ही बैठक होणार आहे. तारळी पंप स्टोरेज प्रकल्प उभारणीमुळे परिसरातील पाण्याचे स्रोत, अन्य जलस्रोत, पाण्याची पातळी तसेच प्रस्तावित आणि सुरू असलेल्या बांधकामांमुळे होणारे संभाव्य परिणाम अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्यावर आणि परिसरातील नैसर्गिक स्रोतांवर कोणते परिणाम होऊ शकतात, याचा आढावा घेतला जाणार आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून कितपत गांभीर्याने घेतले जाते, हे या बैठकीत स्पष्ट होणार आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपवनसंरक्षक, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, सातारा व कोयना सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी, पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतासह विविध विभागांच्या वरिष्ठांना उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. अदानीतर्फे रिन्यूएबल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नरेश तेलंग, तारळी पीएसपीचे प्रकल्पाचे व्यवस्थापक विकेश शर्मा, सहाय्यक व्यवस्थापक कुणाल नाडेदकर, प्रशासन व सुरक्षा विभागाचे प्रमुख डी. एस. राठोड आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख अमोल सूर्यवंशी यांनाही बैठकीस बोलावण्‍यात आले आहे.
......................................
बैठकीत मिळणार प्रश्‍नांची उत्तरे
तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या उभारणीबाबत स्थानिकांनी यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मंत्रालयानेच तक्रारींची दखल घेत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतल्याने प्रकल्पाच्या वाटचालीच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ तक्रारी ऐकून न घेता त्यांची प्रत्यक्ष पडताळणी, संभाव्य परिणामांचा अभ्यास आणि प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारीबाबत ठोस भूमिका घेतली जाणार का, याची उत्सुकता आहे.
.............................................
अदानी कंपनीकडून भूमिका स्‍पष्‍ट
तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणीय आणि वन्यजीव मंजुरीच्या मुद्द्यावर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली. प्रकल्पाच्या कोणत्याही भागाचा समावेश अधिसूचित संरक्षित क्षेत्रात होत नाही. प्रकल्पासाठी कोणत्याही वन जमिनीचा वापर केलेला नाही. प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक परवानगी संबंधित सक्षम प्राधिकरणांकडून घेतल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करून काम सुरू केले आहे, असा दावा कंपनीने या पत्रकात केला आहे. पर्यावरणीय मंजुरीच्या अनुपालन प्रक्रियेचा भाग म्हणून वन्यजीव मंजुरीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण आणि तपासणीच्या कामांसाठीचा प्रस्ताव जानेवारी २०२५ मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाने या प्रस्तावाची शिफारस केली. पुढे कंपनीने प्रकल्प खर्चासाठीचा मंजुरी प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर केला आहे. तो वन्यजीवकडे विचाराधीन असल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रकल्पाची उभारणी लागू असलेल्या सर्व वैधानिक तरतुदी आणि सक्षम प्राधिकरणांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.