
Pune News : महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करापोटी 1600 कोटी रुपयांची भर; विक्रम कुमार
पुणे : महापालिकेच्या तिजोरीमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल 1600 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर मार्च अखेरपर्यंत दोन हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट पुर्ण होण्याची शक्यता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महापालिकेस मिळकत कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर व बांधकाम विभाग अशा विभागांमधून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. यावर्षी मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची सवलत महापालिकेकडून देण्यात आली नव्हती.
त्यानंतरही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळकत करापोटी तब्बल 1600 कोटी रुपये इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. 15 जानेवारीपर्यंत हि रक्कम एक हजार कोटीपर्यंत पोचली होती, त्यानंतर त्यामध्ये चांगलीच वाढ होऊन 6 फेब्रुवारीपर्यंत हि रक्कम 1600 कोटी रुपयांपर्यंत पोचली.
याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ""महापालिकेने मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची सवलत दिली नव्हती. त्यानंतरही आत्तापर्यंत 1600 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अजून दिड ते दोन महिने शिल्लक आहेत, तोपर्यंत महापालिकेने मिळकत करासाठी ठेवलेले उद्दीष्ट पुर्ण होऊ शकणार आहे.''