आदिशक्ती फिरंगाई देवी

आदिशक्ती फिरंगाई देवी

Published on

पुण्यापासून ८० किलोमीटर पूर्वेकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई देवीची प्रसिद्ध दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत. आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे असून त्यानंतर येणाऱ्या एक्कावन शक्तिपीठांत कुरकुंभ येथील फिरंगाई देवीचे प्रथम स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी नवरात्रात तुळजापूर (जि. सोलापूर) येथील आई तुळजाभवानी, राशीन (जि. नगर) येथील आई जगदंबा त्यानंतर कुरकुंभ (जि. पुणे) येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.


कुरकुंभ गावात व बाजूच्या टेकडीवर दोन भव्य हेमाडपंथी मंदिरे आहेत. ही दोन्ही मंदिरे चुना, दगड व वीट यामध्ये बांधलेले होते. गावातील फिरंगाई देवीच्या मंदिराला बाजूने दगडी तटबंदी असून चारही दिशांना प्रवेशद्वार आहेत. परिसरात दीपमाळ, नगारखाना, मंदिरात प्रवेश करताना आतमध्ये आणखी एक सुंदर व कलाकुसर केलेले कमानीसारखे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आतील बाजूने भव्यदिव्य अशी ओसरी आहे. तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मंदिर खूप जुने असल्याने बांधकाम व शिखर मोडकळीस आल्याने लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले. त्यामध्ये चुना व वीट बांधकाम काढून त्या जागी सुंदर दगडी बांधकाम करण्यात आले आहे. तर मंदिराच्या बाजूच्या ओसरीवरील छतावर दर्शन रांगेसाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले असून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वी शेंदूरचर्चित शिळा (तांदळा) व चांदीच्या मुखवटारुपी देवीचे दर्शन होत होते. मात्र हा तांदळा भंग पावल्याने काही दिवसांपूर्वीच विधिवत तांदळा काढून त्या जागी सुंदर पाषाण मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गावातील फिरंगाई मंदिराशेजारी एक छोटे शिखर असलेले महादेवाचे मंदिर आहे. मंदिराजवळ जुन्या काळातील दगडी बांधकामातील वाड्यांचे बांधकाम असून ते सध्या मोडकळीस आले आहेत.

मंदिराचा जीर्णोद्धार
गावातील मंदिराच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारातून टेकडीवरील मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. दर्शनासाठी भाविक पश्चिमेकडील दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करतात. तसेच पूर्वेकडेही एक प्रवेशद्वार आहे. बाजूने मजबूत दगडी बांधकाम आहे. याही मंदिरात डागडुजी व जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे. मंदिरापाठीमागे दोन जुन्या काळातील दगडी बांधकामातील पाण्याच्या टाक्या आहेत. दोन्ही मंदिरात दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या सुंदर कलाकृती दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष आकर्षित करून घेतात. गावात एक सुंदर दगडी विहीर (बारव) असून ती अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. टेकडीवरील फिरंगाई देवीच्या मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे मंदिर आहे. त्यामध्ये महादेवाची पिंड व नंदी तसेच तुकाराम मारुती जाधव (बेलदार) यांची मूर्ती आहे.

यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम
दरवर्षी नवरात्रीमध्ये फिरंगाई देवीची मोठी यात्रा भरते. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये पाचव्या व सातव्या माळेला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक येतात. देवीच्या धार्मिक कार्यक्रमात गावातील सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. त्यांना देवीचे वेगवेगळे मान देण्यात आलेले आहेत. नवरात्र, वार्षिक यात्रा, पौर्णिमा, दसरा इत्यादी सणांच्या दिवसांमध्ये फिरंगाई देवी मंदिरात विविध धार्मिक व विधिवत कार्यक्रम पार पडतात. उत्सवाच्या काळात देवीच्या पालखी मिरवणुकीत गावातील सर्व लोक सहभागी होतात. कुरकुंभ येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी येण्यासाठी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एसटी व इतर दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. तसेच दौंड रेल्वे जंक्शन येथून दहा किलोमीटर अंतरावर कुरकुंभ आहे. दळणवळणाची विविध साधने उपलब्ध असल्याने वर्षभर भाविक फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com